प्रविणकुमार माने : उपसंपादक
हुपरी : कालपासून बालिका बेपत्ता असल्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली होती. लोकांना बालिका सापडण्यासाठी त्यांच्या परीने व्हाट्सअपच्या माध्यमातून प्रयत्न केला होता असताना बेपत्ता ९ वर्षीय बालिकेला सावत्र बापानेच इचलकरंजी येथील पंचगंगा नदीमध्ये घाटावरून ढकलून देऊन घातपात केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी संशयित युवराज आत्माराम साळुंखे (वय ४०) याला ताब्यात घेतले असता त्याने त्याच्या कृत्याची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी आज सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी इचलकरंजी येथे पंचगंगा नदी परिसरात मुलगी प्रणालीचा शोध घेतला. या धक्कादायक घटनेने परिसर हादरला.
मुलीला कधीही फिरायला न नेणाऱ्या संशयित युवराज साळुंखे याने तीन दिवसांपूर्वी तिला पाणीपुरी खायला घातल्याचे तसेच तिला हुपरी व एमआयडीसी परिसरातील कालव्याच्या भागात फिरवून आणल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
ही बालिका रविवारी सायंकाळी ७ .०० च्या सुमारास बेपत्ता झाल्याची वर्दी युवराज साळुंखेनेच दिली; मात्र वर्दीदारच मुख्य संशयित निघाल्याने खळबळ उडाली आहे.
हुपरी पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत बेपत्ता मुलीच्या शोधासाठी रविवारी रात्रीपासूनच शोधमोहीम राबविली आहे.
अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, इचलकरंजी विभागाचे उपअधीक्षक बी. बी. महामुनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यळगूड येथे तातडीने भेट देऊन चौकशी केली. दुपारच्या सुमारास कोल्हापूर येथून श्वानपथकास पाचारण करण्यात आले. त्यावेळी श्वान मुलीच्या घरापासून काही अंतरावर घुटमळले.
दरम्यान, वर्दीदार युवराज साळुंखेवर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला आज दुपारी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने राजकीय लोकांचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याने मुलगीला जंगमवाडी येथे सोडल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी जंगमवाडी येथे मुलीचा शोध घेतला; पण ती सापडली नाही. संशयित दिशाभूल करत असल्याचे पाहून पोलिसांनी खाक्या दाखवला. त्यावेळी त्याने मुलीला मोटारसायकल वरून इचलकरंजी येथे नेले. तेथे पंचगंगेच्या घाटावरून ढकलून दिल्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तपासाची चक्रे गतिमान केली. तपासात नदीघाटावर मुलीच्या पायातील चप्पल आढळून आले आहे. चप्पल मुलीचेच असल्याचे तिच्या आईने ओळखले आहे. पोलिसांनी बोट तसेच पाणबुड्यांकडून मुलीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला; मात्र अंधारामुळे रात्री उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली.
घटनेतील मोटारसायकल (एमएच ०९) ईपी ६३९३) पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, युवराज साळुंखे याची तीन लग्ने झाली आहेत. पूर्वीच्या दोन पत्नी नांदावयास नाहीत. त्याने इचलकरंजी येथील एका महिलेशी तिसरा घरोबा केला. तिच्या आधीच्या पतीपासून असलेली मुलगी त्याच्याकडे होती. सावत्र असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत. निष्पाप मुलगीच्या घातपाताच्या शक्यतेने लोक सुन्न झाले आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक विजय मस्कर तपास करत आहेत.
कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या बालकाच्या अपहरण व खुनाच्या ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी घटना आहे. तसेच या अगोदर शिरोळ तालुक्यातील नराधम बापाने 17 वर्षीय मुलीला दूधगंगा नदीपात्रात ढकलून तिचा खून केला होता. या सर्व घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा