Breaking

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

रुकडी कॉलेजमध्ये शोकसभा ; शैक्षणिक क्षेत्रातील एक उपक्रमशील व अभ्यासू व्यक्तिमत्व हरपलं :माजी खासदार डाॕ.निवेदिता माने

 


सौंदर्या पोवार : विशेष प्रतिनिधी


रुकडी :   कालवश प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे यांच्या अल्पशा निधनानंतर रुकडी कॉलेजमध्ये संस्थेच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष माजी खासदार निवेदिता माने उपस्थित होत्या.

      प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एका अभ्यासू व उपक्रमशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. महाविद्यालयाचा नावलौकिक शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात उंचावण्यासाठी डाॕ. राजगे  यांनी यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाच्या संचालक पदी २०१० ते २०१५ या कालावधीत  काम करण्याची संधी मिळाली होती. ही बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब होती. डाॕ. राजगे यांचं ग्रामीण भागातून कमवा व शिका योजनेतून शिक्षण पूर्ण करुन आले असल्यामुळे रुकडीसारख्या ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे हे ओळखून त्यांनी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असून या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थेचा चांगला मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला त्यांची पोकळी भरुन काढता न येण्यासारखी आहे, असे मत बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खासदार डाॕ.निवेदिता माने यांनी व्यक्त्त केले.त्या येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे यांच्या दुःखद निधन निमित्ताने संस्थेच्या  सर्व शाखांच्या वतीने आयोजित केलेल्या शोकसभेत बोलत होत्या. 

       या शोकसभेत डाॕ.लता मोरे, डाॕ.आरती भोसले, डाॕ.स्मिता राणे, सौ. उज्ज्वला बुल्ले,सौ.पद्मा पाटील, सौ.आशा राऊत, डाॕ.प्रशांतकुमार कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. या मनोगतातून डाॕ.राजगे सर यांच्या आठवणीने उपस्थित सर्वजण गहिवरुन गेले होते. संस्थेच्या सर्व शाखेतील शिक्षक व प्रशासकीय सेवकांनी प्राचार्य डाॕ.राजगे सर यांना आदरांजली वाहिली.

        त्यांच्या या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा