मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूरमध्ये शहिद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला ८ वर्षे पूर्ण झाली असून गुन्हेगार मोकाटपणे फिरत आहेत. शासनाने ही दुर्देवी घटनेची गंभीरपणे दखल न घेतल्यामुळे गुन्हेगार मोकाटपणे फिरत असून अजूनही दाभोळकरांना न्याय मिळाला नसल्याने जयसिंगपूरात शिरोळ तालुक्यातील पुरोगामी संघटनेच्यावतीने मॉर्निंग वॉक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जयसिंगपूर नगरीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समाजवादी प्रबोधिनी शाखा जयसिंगपूर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्र सेवा दल व शिरोळ तालुका पुरोगामी विचार मंच यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
नियोजनाप्रमाणे दसरा चौकापासून मॉर्निंग वॉक रॅलीला सुरुवात झाली आणि रॅलीचा समारोप निषेध भाषण व घोषणाच्या माध्यमातून क्रांती चौकात झाला. या मॉर्निंग वॉक रॅलीचे वैशिष्टय म्हणजे कोरोना महामारीच्या नियमांचं पालन करून अत्यंत शिस्तबद्ध, हातामध्ये प्रबोधनात्मक व निषेधात्मक फलक व संपूर्ण वातावरण दाभोळकरमय करणाऱ्या जोरकस घोषणांच्या माध्यमातून ही रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला होता.
ही रॅली क्रांती चौकात आल्यानंतर शिव-शाहू-फुले-आंबेडकर ; आम्ही सारे दाभोलकर, संविधान बचाव ; देश बचाव यासारख्या अत्यंत भावनामय घोषणेच्या माध्यमातून हा परिसर दणाणून निघाला. त्यानंतर राष्ट्र सेवा दल संघटक साथी बाबासाहेब नदाफ, प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. चिदानंद आवळेकर, एफ.वाय.कुंभोजकर, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे,डॉ.अजित बिरनाळे,डॉ.अतिक पटेल,प्रा. शांताराम कांबळे,तरुण कार्यकर्ती कल्याणी अक्कोळे,शिरोळ तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे या सर्वांनी शासनाचा व या व्यवस्थेचा तीव्र भाषेत निषेध व्यक्त करीत डॉ.दाभोळकर,कलबुर्गी,गौरी लंकेश व कॉ.पानसरे यांच्या हत्येमागे कोणत्या तथाकथित संघटनांचा हात असल्याचे उघड होऊन देखील सरकार त्यांच्यावर बंदी न घालता उलट त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करीत आहे.
संविधानाचे तंतोतंत पालन करून विवेकवादी व समतावादी विचाराने समाज परिवर्तन करण्याचा तसेच अहिंसेचा स्वीकार व हिंसेचा नेहमीच नकार करून आयुष्यभर सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या शहीद डॉ.दाभोळकरांची हत्या केली. तसेच त्यांच्या हत्येने या चळवळीत काम करणाऱ्या देशातील प्रत्येक घटकाचा अवमान झाला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय व निषेधार्थ आहे अशा प्रकारचा विचार या कार्यकर्त्यांनी मांडला. डॉ.दाभोळकर यांची हत्या करून त्यांचं शरीर नाहीसे झाले परंतु त्यांचा विचार मात्र नष्ट करता आला नाही किंबहुना त्यांची विवेकवादी विचारधारा अत्यंत वेगाने व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास व वैचारिक बळ वाढवणारी झाली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी संघटनेचे कार्य आणखी विस्तारित व प्रेरणादायी झाली आहे अशा प्रकारचे विचार पोटतिडकीने व्यक्त करण्यात आले.
या मॉर्निंग वॉक रॅलीमध्ये शिरोळ तालुक्यातील प्रतिष्ठित डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कामगार,पुरोगामी संघटनेचे विचारवंत व महिला कार्यकर्ते व पत्रकार सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा