Breaking

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

कोविडजन्य परिस्थितीतुन अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी एकसंधपणे काम करणे गरजेचे : ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.नरेंद्र जाधव

 

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.नरेंद्र जाधव


प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक


कोल्हापूर, दि. १६ ऑगस्ट: कोविड-१९ महामारीमुळे देशाची आर्थिक प्रगती निश्चितपणे प्रभावित झाली असून दारिद्र्यरेषेवर असणारी बहुसंख्य कुटुंबे या काळात दारिद्र्यरेषेखाली ढकलली गेली आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला नजीकच्या काळात कोविडजन्य परिस्थितीतुन अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी एकसंधपणे काम  करावे लागणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

      डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात सदर विशेष व्याख्यानमाला आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. तसेच कोरोना नंतरच्या बदलत्या परिस्थितीनुसार देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये सांगोपांग चर्चा व मार्गदर्शन व्हावे हे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थतज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी डॉ. जाधव यांचा परिचय करून देताना उपस्थितांच्या मध्ये काम करण्याचं स्फुरण निर्माण झाले.

      शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने ‘आर्थिक धोरणे व सद्यस्थिती’ या विशेष ऑनलाईन व्याख्यानमाले अंतर्गत पहिले पुष्प गुंफताना ‘माझा जीवनकाळ’ (माय लाइफ अँड माय टाइम्स) या विषयावर डॉ. जाधव बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्र् डॉ. यशवंतराव थोरात प्रमुख उपस्थित होते.

          देशाच्या आर्थिक धोरणांचा वेध घेत असताना माझ्या जीवनकार्याशीच निगडित हा विषय असल्याने ‘माझा जीवनकाळ’ या अनुषंगाने मांडणी करणार असल्याचे सुरवातीलाच सांगून डॉ. जाधव यांनी त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक वाटचालीचा अभिनव पद्धतीने वेध घेतला. ते म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँकेने काम करण्याच्या तसेच सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. त्या संधी घेत वेगळ्या पद्धतीने काम करीत गेलो. जगभरातल्या संघटनांशी जोडला गेलो. त्याचप्रमाणे भारताच्या आर्थिक धोरण निश्चितीमध्ये रिझर्व्ह बँक, नियोजन आयोग तसेच अन्य विविध समित्या यांच्या माध्यमातून योगदान देता आले, याचे समाधान आहे.डॉ. जाधव यांनी, भारताने सन १९९१मध्ये जे नवे जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले, त्यामध्ये अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या बरोबरीनेच भारतीय रिझर्व्ह बँक आणि तत्कालीन गव्हर्नर वेंकटरमण या अत्यंत विद्वान व्यक्तीमत्त्वाचेही महत्त्वाचे योगदान राहिले आहे, ही बाब त्यांच्या व्याख्यानात अधोरेखित केली.

     आपल्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या कार्याचा वेध घेताना डॉ. जाधव यांनी इथिओपियातील सरकारचे आर्थिक सल्लागार, हवाला मार्केट अभ्यासासाठी दुबईला गुप्त भेट, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आयएमएफ)मधील साडेचार वर्षे आणि नॅशनल एडव्हायजरी कौन्सिल व नियोजन आयोगातील कारकीर्द यांचा सविस्तर आढावा घेतला. या माध्यमातून आयएमएफची कोटा पद्धती ही विकसनशील देशांसाठी मारक असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्याचप्रमाणे सोनेबाजार खुला करून तस्करीचे कंबरडे मोडण्याचा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चीफ इकॉनॉमिस्ट हे विशेष पद त्यांच्यासाठी निर्माण केले आणि त्यांच्यानंतर रद्द केले, असा महत्त्वाचा अनुभवही त्यांनी सांगितला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद हे केवळ सामाजिक न्यायाचा फेरा पूर्ण करण्यासाठी आपण स्वीकारले आणि अवघ्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत शिक्षण क्षेत्राला भरीव योगदान देता आले, याचे समाधानही डॉ. जाधव यांनी व्यक्त केले. त्या काळात आपण ‘समर्थ भारत अभियाना’ची मुहूर्तमेढ रोवली. हेच अभियान आज ‘उन्नत भारत’ नावाने केंद्र सरकार चालविते आहे, हे मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर आणि डॉ. आंबेडकर म्युझियम यांची पाठपुरावा करून पूर्तता करता आल्याचेही समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. नामनिर्देशित खासदार असूनही सभागृहात नियमित व पूर्णवेळ उपस्थिती तसेच कामकाजात सहभाग घेऊन जनहिताच्या, देशहिताच्या अनेक प्रश्नांबाबत चर्चा करून मार्ग काढण्याची संधी लाभल्याचे विद्यार्थ्यांनी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड न करता पुढे जायला हवे, प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता उभे राहायला शिकले पाहिजे आणि जे कराल, त्यात सर्वश्रेष्ठ होण्याचे ध्येय बाळगले पाहिजे, हे स्वतःच्याच आयुष्यातील अनेक उदाहरणे देऊन डॉ. जाधव यांनी ओघवत्या भाषेत सांगितले.सध्या आपण ‘आंबेडकर आणि गांधी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना’ आणि ‘भारतातील जाती व अमेरिकेतील वंश’ ही तीन महत्त्वाची पुस्तके लिहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

        कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, डॉ. नरेंद्र जाधव यांनी अत्यंत अभिनव आणि ओघवत्या शैलीत त्यांच्या जीवननुभवातून अनेक महत्त्वाचे धडे युवा पिढीला सांगितले आहेत. त्यांनी केलेले मार्गदर्शन केवळ, संशोधक, अर्थतज्ज्ञांसाठीच नव्हे, तर कुटुंबातल्या, भोवतालातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त स्वरुपाचे आहे. विशेषतः कोणत्याही स्वरुपाच्या अन्यायाविरुद्ध आत्मविश्वासाने उभे राहण्याचा, आवाज उठविण्याचा त्यांचा गुणविशेष अत्यंत मार्गदर्शक आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा