Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

बत्तीस शिराळामध्ये जिवंत नाग सापडल्यामुळे उडाली खळबळ : वन विभागाने केली कारवाई

 


जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी


सांगली : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात येत असतो.मात्र सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे एका फार्महाऊसवर तब्बल 19 जिवंत नाग ठेवले असल्याची माहिती वन विभागाला मिळताच  शिराळ्याच्या वन विभागाने ही कारवाई केली आहे. 

     हे नाग फार्महाऊसवर मडकी, पोती आणि पिशवीमध्ये बंदिस्त करून ठेवलेले होते. वन विभागाने कारवाई करून हे नाग जप्त केले आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. याबाबत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     वन विभागाला निनावी दूरध्वनी फोन आला आणि फार्म हाऊसमध्ये नाग बंदिस्त करून ठेवले असल्याची माहिती मिळाली. या बंदिस्त नागांचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती वनविभागाला समजली. त्यामुळे ही माहिती मिळताच शिराळा येथील वनक्षेत्रपाल वनपाल वनरक्षक आणि सांगलीतील वन विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेले. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी मडकी, पोती, पिशवी ठेवलेल्या दिसल्या. यात 19 नाग आढळून आले.

        नागांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या प्रकरणी वन विभागाने अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत शिराळा येथे मोठ्या प्रमाणात नाग सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा