Breaking

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

सहकाराच्या बळावरच सर्वांगीण विकास होऊ शकतो हे काम शिरोळच्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याने करून दाखविले : राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर

 


गणेश कुरले : शिरोळ प्रतिनिधी


      आज शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे टाकले आहेत. यातून मार्ग काढून मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांचे सबलीकरण करणे आवश्यक बनले आहे. साखर कारखानदारीच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तारू शकते असेच युवावर्गाला वाटत आहे. सामाजिक बांधिलकी जपून साखर कारखानदारीने आर्थिक, सहकार, कृषी, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रात क्रांती करून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदललेला आहे. सहकाराच्या बळावरच सर्वांगीण विकास होऊ शकतो हे काम शिरोळच्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याने करून दाखविले. ७ हजार एकर क्षारपड जमीन क्षारमुक्त करून श्री दत्त कारखान्याने प्रचंड मोठे कार्य केले आहे, असे प्रतिपादन म. फुले कृषी महाविद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांनी केले.

      शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कमी खर्चाच्या शाश्वत ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत शास्त्रज्ञ आणि शेती तज्ज्ञांचे चर्चासत्र कारखाना कार्यस्थळावर आयोजित केले होते. यामध्ये डॉ. योगेंद्र नेरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

      प्रारंभी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कमी खर्चात शाश्वत एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी काय करावे, एकात्मिक खत व्यवस्थापन कसे असावे, सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी व कायम टिकवण्यासाठी काय करावे, सरळ खतांचा वापर कसा करावा, ऊस पोकळ पडू नये म्हणून काय करावे, पांढरी मुळी कार्यक्षम ठेवण्यासाठी विशेष उपाय काय असावेत, रोग व किडींचे प्रमाण कमी करण्यासाठी खतांचे प्रमाण काय असावे, लहान रोपे बुडाल्यास पुढील उपाययोजना काय करावेत, नदी बुड क्षेत्रासाठी ऊस जाती व पर्यायी पीक कोणते असावे असे विविध प्रश्न उपस्थित करून शास्त्रज्ञ व शेतीतज्ज्ञांनी यामधून उपाय सुचवावेत असे आवाहन केले. डॉ. अरुण मराठे, डॉ. सुरेश पवार, डॉ. बी. पी. पाटील, डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. भरत रासकर, डॉ. प्रिती देशमुख, सुधा घोडके, कु. सुप्रिया कुसाळे, डॉ. बापूसाहेब गायकवाड, डॉ. विद्यासागर गेडाम, डॉ. अशोककुमार पिसाळ आधी शास्त्रज्ञांनी चर्चासत्रात भाग घेऊन विविध माहितीच्या आधारे प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. प्रोजेक्टरद्वारे माहिती देण्यात आली. योग्य ऊस बियाणे, खतांची आणि पाण्याची योग्य मात्रा, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठीच्या पद्धती, माती व पाने परीक्षणानुसार शिफारसी, पीक पालट, संजीवकांचा वापर, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान या सर्व गोष्टींवर विस्तृतपणे चर्चा करून काही ठोस आराखडा तयार करण्यावर सर्वांनी भर दिला. कृष्णा व पंचगंगेच्या प्रदूषित पाण्याच्या समस्याबरोबरच महापूर काळात ऊस शेतीच्या नुकसानीबाबत काय करण्यात येऊ शकते याचा विचारही यावेळी झाला. तसेच आगामी काळात श्री. दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी विविध फायद्याचे उपक्रम राबविण्यासंदर्भात सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे शास्त्रज्ञ व शेतीतज्ज्ञांनी सांगितले. यावर दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी सर्व अंगाने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दत्त कारखाना सदैव पुढाकार घेईल अशी ग्वाही दिली. तसेच शास्त्रज्ञ व शेतीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.



प्रारंभी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सर्व उपस्थित शास्त्रज्ञ व शेतीतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला.  व्याख्याते वसंतराव हंकारे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरही उत्तरे देण्यात आली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, संचालक ऍड. प्रमोद पाटील, शेखर पाटील, महेंद्र बागी, ए. एस. पाटील, शरद पाटील, प्रा. मोहन पाटील, कृषी विभागातील सर्व खातेप्रमुख व प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते. आभार ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी मानले.

        अत्यंत अभ्यासपूर्ण व वैचारिक मंथन घडवून आणणारी ही कार्यशाळा संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा