Breaking

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

यशोधर नगरीत खुनाचा सलग दुसरा दिवस ; नागपुरात एकाची गळा चिरून हत्या

 


नागपूर :   हे गुन्हेगारांचे केंद्रबिंदू बनत चालले आहे. कारणही तसंच आहे गेल्या दोन दशकात महाराष्ट्रातील गुन्ह्याची सर्वात संख्या नागपूर शहरात आहे. गेल्या सलग दोन दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दारु पिण्याच्या वादातून चुलत भावानेच तरुणाची हत्या केल्याची घटना नागपुरात ताजी असताना दुसऱ्याच दिवशी वर्चस्व वादातून एकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर येत आहे.

       रविवारी रात्री नागपुरात वर्चस्वाच्या वादातून तिघांनी एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी जवळ असलेल्या गणेश भोजनालयाच्या समोर हे हत्याकांड घडलं. आवेश खान पठाण असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तीनही मारेकरी फरार झाले आहेत.


आरोपींच्या शोधासाठी पोलिसाची पथके रवाना


घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आला. पोलिसांनी मारेकऱ्यांबाबत माहिती काढली असून पोलिसांची दोन पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


सलग दोन दिवस हत्येच्या घटना :


धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या झाली होती. शनिवारी रात्री अजय भारती याची दारू पिण्याच्या वादातून चुलत भावाने हत्या केली होती. तर रविवारी रात्री आवेश पठाणची हत्या करण्यात आली.


नागपुरात फ्रेंडशिप डेला हत्या


फ्रेंडशिप डेच्या वेळी झालेल्या वादातून 21 वर्षीय अनिकेत भोतमांगे या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार नागपुरात दोन आठवड्यांपूर्वी उघडकीस आला होता. फ्रेंडशिप डेला झालेल्या भांडणानंतर नंदनवन ठाण्यातील हिवरी नगर भागात मित्रांनी अनिकेतची हत्या केल्याचा आरोप झाला होता. अनिकेत हा विंडो फ्रेमिंगचे काम करायचा.


अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाची हत्या


दुसरीकडे, गॅरेजमधील सहकारी मित्राच्या अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाने त्याची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात नागपुरात उघडकीस आली होती. डोक्यावर टॉमीने वार करुन तरुणाचा खून करण्यात आला. राजू नागेश्‍वर असे मृताचे नाव होते, तर देवांश वाघाडे असे आरोपीचे नाव आहे. अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याने तरुणाने सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप झाला होता.

    अशा घटनेनी नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा