Breaking

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

बोलघेवडी आत्मनिर्भरता आणि देशाचं दिवाळ

 


               ज्येष्ठ विचारवंत व लेखक 

   मा.प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

                  (९८५०८ ३०२९०)


इचलकरंजी  : २० ऑक्टोबर २०२१ रोजी मा. पंतप्रधानांनी तेल ,गॅस, नैसर्गिक तेल व वायू या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांशी चर्चा केली. स्वच्छ विकास तसेच स्थैर्याला प्रोत्साहन देणे हा या बैठकीचा मुख्य विषय होता असे सांगण्यात आले.त्यामध्ये मा. पंतप्रधान इंधनदरवाढी  विरोधात शाश्वत उपायांवर भर देणार असल्याचे म्हणाले. तसेच भारताला तेल आणि वायू क्षेत्रात ' आत्मनिर्भर ' बनवण्याच्या ध्येयाने भविष्यात अनेक सुधारणा होत राहतील असे स्पष्ट केले.याचा दुसरा अर्थ इंधन दरवाढ कमी होणार नाही. जनतेनेच आता गाड्या न  वापरता पेट्रोलवरील खर्च कमी करावा असा आहे.वास्तविक गेल्या सात वर्षात महागाई अत्यंत वेगाने वाढत आहे.जीवनावश्यक असणारे अन्न, धान्य, तेल यासह सर्व वस्तू,सिमेंट,स्टील,वाळू,रेल्वे ,बॅंकिंग,गॅस,रॉकेल ,प्लॅटफॉर्म तिकीट,प्रवास,अशा हरेक किमतीत दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे.सबसिडी शून्यावर आली आहे.स्मार्ट सिटी ते मेक इन इंडिया सारे फेल गेले आहे. नोटबंदी सारखे आततायी निर्णय अर्थव्यवस्थेच्या मुळावर उठले.दारिद्य्र रेषेखालील लोकांची संख्या दुप्पट वाढली आहे.करोडोंचा रोजगार गेला आहे.देशाचे कर्ज अडीच पटीने वाढले.नवनिर्मिती शून्य आणि असलेले विकणे जोरात सुरू आहे. लोकांचे जगणे कठीण झाले आहे.सामान्य नागरिकांचे परावलंबित्व वाढत जात आहे.त्यावर नेमक्या व तातडीच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. उलट त्याला बगल देऊन आत्मनिर्भरतेच्या बोलघेवड्या अशास्त्रीय चर्चा घडवून आणल्या जात आहेत.विकासाच्या घोषणेचे शरीर मर्त्य झाले आहेच.

      आत्मनिर्भरतेच्या गप्पा करत विकासात आत्मा शोधणारेही थंडगार पडले आहेत.प्रश्न व्यक्तीचा नसतो तर धोरणांचा असतो. देश वाचवायचा असेल तर धोरणे बदलणे फार गरजेचे आहे.कारण या देशातील प्रत्येक नागरिक देशप्रेमी आहे.त्याला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.त्यामुळे राज्यकर्त्यांचे धोरण चुकले की त्याचा फटका देशातील करोडो सर्वसामान्य माणसांना बसतो. दिवाळीच्या शुभेच्छा देत असतांना देशाचं दिवाळ काढणारी धोरणे बदलणे महत्वाचे आहे.


(समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा