माता अंबाबाई |
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराचे दरवाजे भाविकांना खुले झाले आहेत. भाविकांना अंबाबाईचे पहाटे चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. मात्र ऑनलाईन पास घेतलेल्यानाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. अन्य भाविकांसाठी मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांना पास असणे बंधनकारक आहे. पाससाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. दर्शना वेळी आधार कार्डची झेरॉक्स प्रत दाखवणे बंधनकारक राहणार आहे. दर्शनासाठी ४८ तास आधी बुकिंग करता येणार आहे. 60 वर्षावरील व्यक्ती, दहा वर्षाखालील मुले तसेच गर्भवती महिला आणि आजारपण असलेल्यांना प्रवेश नसणार आहे.
*कोल्हापूर : अंबाबाई मंदिर सुरक्षिततेची पोलिस अधीक्षकांकडून पाहणी*
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर अधीक्षक तिरूपती काकडे यांनी शनिवारी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरसह परिसरातील सुरक्षिततेची पाहणी केली. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशीच अंबाबाई मंदिराचा दरवाजा खुला होणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेवून सुरक्षिततेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरसह परिसरात सोशल डिस्टन्सन, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर बंधनकारक असल्याचेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. सुचनांचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कारवाईच्या सुचनाही जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नवरात्रौत्सव काळात महाराष्ट्रासह देशाच्या काना कोपऱ्यातून भाविकांची गर्दी लक्षात घेवून मंदिरसह परिसरात ठिकठिकाणी साध्यावेशातील पोलिस पथके नियुक्तीच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा