Breaking

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

श्री दत्त- साखर कारखाना, शिरोळच्या ५० व्या ऊस गळीत हंगामाची उत्साहात सुरुवात




पुढीलवर्षी १२ हजार मे.टनाने गाळप, १६० केएलपीडी डिस्टीलरी व इथेनॉल उत्पादन करणार : चेअरमन गणपतराव पाटील


शिरोळ/प्रतिनिधी : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,शिरोळ च्या सुवर्णमहोत्सवी ऊस गळीत हंगामाची सुरुवात आज (दि.२१) सकाळी १० वाजता उद्योग समुहाचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. काटापूजन संचालक अनिलकुमार यादव, रणजित कदम, इंद्रजित पाटील, अरुणकुमार देसाई व प्रमोद पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.




    यावेळी बोलताना चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, यावर्षी १२ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून रिकव्हरी १२.४० च्या वर ठेवण्याचा मानस आहे. पूरबाधीत ऊस प्राधान्याने गाळप करण्यात येणार आहे.पुढील वर्षी दररोज ११ ते १२ हजार मे.टनाने गाळप, तसेच १६० केएलपीडी डिस्टीलरी व इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्लॅन्टच्या माध्यमातून दररोज ९० सिलेंडर्सचे उत्पादन सुरु केले आहे.

     देशातील नामांकित शास्त्रज्ञ आणि शेती तज्ज्ञांनी चर्चासत्रात सुचविल्याप्रमाणे ऊसाला पर्यायी पिकाचा विचार सुरु करुन प्रायोगिक तत्वावर बिटापासून साखर तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच आंबा,चिक्कू, पेरु या पर्यायी पिकांचाही विचार केला जात आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविणे, सेंद्रीय शेती,सेंद्रीय साखर उत्पादनाला कारखान्याने प्रोत्साहन दिले आहे. त्याला यशही येत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ७ हजार कर क्षेत्रावर क्षारपड जमिन क्षारमुक्त करण्याचा प्रकल्प यशस्वी झाला असून भविष्यात १५ हजार एकरावर हे काम सुरु करण्यात येणार आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी पुस्तिका प्रकाशीत करुन तसेच पाणी,पाने व माती परिक्षण मोफत करुन देत आहे. परिसरातील शेती, शेतकरी, सभासद आणि कामगारांचे सर्वांगीण हित जोपासण्याचे काम कारखान्याने केले असून यापुढेही या मार्गावर कार्यरत राहणार आहोत. कारखान्याने सभासद, कामगार, बँका, तोडणी-वहातूक कंत्राटदार, मक्तेदार या सर्वांची देणी वेळच्यावेळी दिली असून कारखाना सद्यस्थितीला आर्थिकदृष्टया सक्षम आहे. यावेळी आभार व्यक्त करताना संचालक अनिलराव यादव यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या नावाने देशातील ऊस उत्पादक शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व अत्याधुनिक सोयींनीयुक्त मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला.



     यावेळी केडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, जि.प.सदस्य अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर,माजी जि.प.सदस्य महादेवराव धनवडे, धनाजीराव जगदाळे, भवानीसिंह घोरपडे-सरकार, तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे, अशोकराव निर्मळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या सर्वांनी कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या. तसेच आजपर्यंत कारखाना हा अतिशय उत्कृष्टपणे चालविला असून हा कारखाना देशातील एक नामांकीत कारखाना आहे. सभासद व कामगारांचे नियमितपणे हित या कारखान्याने जोपासले आहे. या कारखान्याचे शिल्पकार स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील व त्यांचे सर्व सहकारी तसेच आता उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज अत्यंत चांगल्या पध्दतीने चालू आहे. त्याबद्दल त्यांचे व संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी हेरवाड विकास सेवा सोसायटीचे चेअरमन निगोंडा पाटील, मफतलाल पाटील व सुकुमार पाटील यांनी चेअरमन गणपतराव पाटील यांचा एकरकमी एफआरपी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील, सर्व संचालक, संचालिका, शिरोळ, जयसिंगपूर,कुरुंदवाड येथील आजी माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, दत्त ऊस वाहतुक संघटनेचे पदाधिकारी, कामगार युनियनचे पदाधिकारी, सर्व खाते प्रमुख व कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा