पंडित जवाहरलाल नेहरू |
ज्येष्ठ विचारवंत मा.प्रसाद माधव कुलकर्णी |
इचलकरंजी : ,दीडशे वर्षे सर्वांगीण शोषण करणाऱ्या ब्रिटिश राजवटीला १८५७ ते १९४७ अशी नव्वद वर्षे लढा देऊन भारतीय जनतेने भारतभू ला स्वतंत्र केले. त्यासाठी हजारोनी बलिदान दिले.लाखोंनी सहभाग दिला.या स्वातंत्र्य आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढणारे पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी आपल्या अखेरीपर्यंत सलग सतरा वर्षे या देशाचे नेतृत्व केले. शून्यातून विश्व निर्माण करावे तशी या देशाची उभारणी केली.नवस्वतंत्र देश असूनही जागतिक राजकारणात आपल्या प्रज्ञेने,विद्वत्तेने अतिशय उंचीचे स्थान प्राप्त केले. तर देशांतर्गत राजकारण,अर्थकारण,समाजकारण यामध्ये राज्यघटनेची मुल्ये रुजवण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला.आजच्या सर्वांगीण ढासळत्या काळात नेहरू मॉडेल हेच विकासाचे खरे मॉडेल आहे.त्या योजनाबद्ध विकासाचा कार्यक्रम राबविण्याची गरज आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३२ व्या जन्मदिनानिमित्त ' नेहरू विचाराचे प्रारूप ' या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते.चर्चासत्राच्या प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी विषयाची सविस्तर मांडणी केली. तुकाराम अपराध यांनी समारोप केला.
यावेळी असे मत पुढे आले की,ब्रिटिशांनी खिळखिळ्या केलेल्या या देशाची पुनर्बांधणी नेहरूंनी केली.त्यांची आत्मनिर्भरता राष्ट्रीय उद्योग उभारणीवर आधारित होती.राष्ट्रीय उद्योग विकून खाणारी वाटोळी परनिर्भरता नव्हती.कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे आहेत ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे. भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन भविष्याची दिशा देण्याचे काम नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकात अतिशय प्रभावी पणे केले.आज नेहरूंना खुजे ठरवू पाहणारे त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या,विचारांच्या,विद्वत्तेच्या, आकलनाच्या,व्यापक दृष्टीकोनाच्या ,देश उभारणीच्या आसपासही फिरकू शकत नाहीत.या चर्चेत नेहरू यांच्या विकासाच्या प्रारुपाचे आणि त्यातुन झालेल्या फलनिष्पत्तीची विविध अंगानी सोदाहरण चर्चा करण्यात आली.
यावेळी अभिनेत्री कंगना राणावत यांच्या देशाचा अपमान करणाऱ्या विधानाचा निषेध करण्यात आला. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत फाटक यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी प्रसाद कुलकर्णी, तुकाराम अपराध,पांडुरंग पिसे, राजन मुठाणे,अशोक केसरकर,दयानंद लिपारे, सचिन पाटोळे, मनोहर जोशी,शकील मुल्ला, नारायण लोटके ,अशोक मगदूम,आदींनी सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा