Source : patrika.com |
मणिपूर : मणिपूरमध्ये अत्यंत चाणाक्षपणे नियोजन बद्ध लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराचे एक कर्नल, त्यांची पत्नी, मुलगा आणि ४ जवान शहीद झाले असल्याची अधिकृत माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.
सदर भ्याड हल्ला हा एक प्रकारे गेल्या काही वर्षांतील सर्वात प्राणघातक हल्ला असल्याची चर्चा आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०.०० वाजता मणिपूरच्या सुरज चांद जिल्ह्यात म्यानमार सीमेजवळ ही घटना घडली असल्याचे समोर येत आहे.
४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी शनिवारी फॉरवर्ड कॅम्पमध्ये गेले होते आणि परत येत असताना त्यांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला झाला.या हल्ल्यामागे मणिपूरस्थित कुविख्यात पीपल्स लिबरेशन आर्मी किंवा पीएलए या दहशतवादी संघटनेचा संबंध असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
मात्र, आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी काउंटर ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
या हल्ल्याने मणिपूरमध्ये पुन्हा या दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याची माहिती कळते आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा