Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

"पलूसच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रम : पानिपत मराठ्यांच्या प्रखर पराक्रमाची गाथा : प्रसिद्ध वक्ते व प्रा.डॉ.उल्हास माळकर"


प्रसिद्ध वक्ते डॉ.उल्हास माळकर व मान्यवर


*प्रा.मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*


पलूस : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस येथे प्रोफेशनल विभागाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. उल्हास माळकर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भाऊ पाटील, संस्थेचे सचिव धोंडीराम अण्णा शिंदे,डॉ.एस.एस.पाटील व प्राचार्य डॉ.आर.एस.साळुंखे उपस्थित होते.

     चरित्रकार व प्रमुख वक्ते डॉ.उल्हास माळकर पानिपतची वास्तव गाथा मांडताना ते म्हणाले,२६० वर्षापूर्वी पानिपतावर मराठ्यांनी प्रखर पराक्रम करून हिंदुस्तानचे संरक्षण केले.मराठ्यांचा पराभव हा एक तांत्रिक भाग होता. परंतु प्रत्यक्षात मराठ्यांनी युद्धाचा हेतू साध्य करीत आपल्या पराक्रमाची यशोगाथा इतिहासात नोंद केली.

         डॉ.माळकर पुढे म्हणाले की, इतिहासातील काही पराभव हे विजया पेक्षा सुद्धा अधिक गौरवास्पद असतात. त्यातील एक पानिपतचे तिसरे युद्ध होय .यावेळी अहमद शहा अब्दाली विजय मिळून सुद्धा त्याच्या हाती फारसे काही लागले नाही. याउलट मराठ्यांनी मात्र परकीय आक्रमकांवर प्रचंड पराक्रमाने दहशत बसवली. त्यानंतर हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचे धाडस कोणीही केले नाही .मराठ्यांनी आपल्या मातृभूमीपासून हजारो किलोमीटर दूर जाऊन पैसा, रसद पुरवठा यांच्या अभावीं एकाकीपणे शत्रूला जेरीस आणले. उत्तर भारतातील कोणत्याही राजांनी मराठ्यांना मदत केली नाही. याप्रसंगी रण मैदानावरील मराठ्यांची अचाट क्रुत्ये पाहून अहमदशहा अब्दाली सुद्धा भयचकित झाला आणि त्याने आपला जनानखाना युद्धभूमी पासून सुरक्षित अंतरावर पाठीमागे नेला.यावेळी युद्धात आपल्या काही अनुभवी सरदारांच्या अतिउत्साहामुळे युद्धाचे पारडे पालटले .युद्धाच्या धामधूमीत पानिपत वरून पळून आलेल्यांनी आपली कातडी बचावण्यासाठी केलेला खटाटोप म्हणजे भाऊसाहेबा वरील दोषारोप होय. युद्धभूमीवरील मराठ्यांच्या कामगिरीविषयी खुद्द अब्दाली लिहितो," त्यादिवशी आमच्या शत्रूने  रणभूमीवर अचाट कृत्ये करून स्वतःला नामांकित करून सोडले.मराठ्यासारखी  युद्धाची अशी खुमखुमी, आणि युद्ध लालसा, जगात कुठेच नाही ."यावरून मराठ्यांना दोष देणाऱ्या स्वकीयांनी काही बोध घेतला तर बरे होईल अशाप्रकारे मार्गदर्शन करीत त्यांनी मराठ्यांचा पराक्रमाचा जिवंत इतिहास आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी व उत्तम वक्तृत्वाच्या माध्यमातून उभा केला.

      सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक प्रा.धनंजय कलंगे यांनी केले. प्राचार्य डॉ.आर.एस.साळुंखे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना वर्तमान युगातील तांत्रिक व कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील आव्हानाची जाणिव करून दिली.  

    याप्रसंगी प्रा.सचिन जाधव,कु.निशा कांबळे व सौरभ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन कु.राधिका माळी हिने केले.प्रा.सौ.अवंतिका जाधव- शिंदे यांनी उत्तम व नेटके आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

      सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून पानिपतमधील मराठ्याचा इतिहास डोळ्या समोर उभा करून नवचैतन्य निर्माण केले अशा प्रकारची प्रतिक्रिया उपस्थित विद्यार्थ्यांनी दिली.

1 टिप्पणी: