Breaking

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

*कोल्हापुरातील एलसीबीचे दोन पोलीस कॉन्स्टेबल लाचेच्या मुद्देमालासह रंगेहात सापडले; एसीबी टीमच्या या धाडसी कारवाईने सर्वत्र होत आहे कौतुक*

 

कोल्हापूर एलसीबीचे दोन पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात सापडले

*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


     कोल्हापूर : काही दिवसापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या उत्तम कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत असतानाच अशावेळी मात्र कोल्हापूर शहरातील गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबल हे लाचेच्या मुद्देमालासह रंगेहात पकडले.

         कोल्हापूरातील एका फिर्यादीला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन दहा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले.किरण धोंडीराम गावडे (वय वर्ष ३७, रा. केदार नगर मोरेवाडी) आणि विजय केरबा कारंडे (वय वर्ष ५०, रा. उचगाव  जि. कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत.

    कोल्हापूर पोलीस मुख्यालय कार्यालयातर्गत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. संशयित कॉन्स्टेबल विरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे, असे बुधवंत यांनी सांगितले.

      पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा वकील पुत्राचा मोटरकार तसेच दुचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वकील पुत्राने ८दिवसांपूर्वी पनवेल येथून जुन्या वापरातील स्पोर्ट्स बाईक खरेदी करून कोल्हापुरात आणल्या होत्या. दुचाकी भंगारमध्ये काढण्यासाठी त्यांनी रितसर परवाने घेतले होते. मात्र विजय कारंडे आणि किरण गावडे या दोघांनी संबंधित फिर्यादीला गाठले. मुंबई व पुण्यातून दुचाकी चोरून आणून कोल्हापुरात विकतो काय असा जाब विचारत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात तुला अटक करून तुझ्यावर मोका लावतो, तुझी सार्वत्रिक बदनामी करतो अशी धमकी दिली. तसेच हे प्रकरण तातडीने थांबवायचे असेल तर २५ लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा कारवाई अटळ आहे, असे त्याने धमकावले.हे दोन पोलिस संबंधित तरुणाला दिनांक १८ आणि १९ रोजी पोलीस मुख्यालयात चौकशीसाठी घेऊन गेले होते. २५ लाख दिल्याशिवाय सुटका होणार नाही असे दोघांनी बजावल्याने तरुण घाबरला. अखेर त्याने १० लाख रुपये देण्याचे मान्य केले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांची भेट घेऊन रितसर तक्रार दाखल केली. आज सकाळी एसीबीचे पथकाने पोलीस मुख्यालय आवारा लगत अलंकार हॉलजवळ पडताळणी केली. पोलीस कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे या दोघांनी पुन्हा पैशाची मागणी केली. दुपारी पोलीस मुख्यालयाच्या पिछाडीला वकील पुत्राकडून १० लाख रुपये घेऊन कारंडे आणि गावडे यांनी सदर रक्कम स्वतःच्या मोटारीतील डिकीमध्ये ठेवली. पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने पाठलाग करून १० लाखांची रोकडसह दोघांना ताब्यात घेतले. पोलिस मुख्यालय परिसरात हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

       एसीबीच्या या अत्यंत धाडसी कारवाईने व समस्त पोलीस यंत्रणेने त्यांच्या प्रामाणिक कर्तव्याचा आदर्श घ्यावा तसेच त्यांच्या उत्तम कामगिरी बाबत सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा