ऑनलाइन व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ.सुभाष शेळके |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
मिरज: शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्यावतीने विवेकानंद जयंती सप्ताह व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 'ज्ञानशिदोरी' उपक्रमांतर्गत मा. डॉ. सुभाष शेळके यांचे 'शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे: एक योद्धा शिक्षणतज्ञ' या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमात डॉ. सुभाष शेळके यांनी आपल्या सहजसाध्य वक्तृत्वातून एक स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, मुख्याध्यापक ते शिक्षणमहर्षी असा बापूजींच्या जीवनाचा प्रवास उलगडला. आयुष्यात आलेल्या खडतर प्रसंगांमध्ये हार न मानता बापूजींमधील योद्धा शैक्षणिक विकासासाठी अविरतपणे कसा झगडत राहिला याचे चित्र त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून श्रोत्यांच्या नजरेसमोर उभे केले. १९४५ ते ५५ या कालावधीत बापूजींनी रयत शिक्षणसंस्थेमध्ये दिलेल्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेची निर्मिती हे बापूजींच्या ध्येयाचे फलित आहे, बापूजींनी आपल्या कार्यातून सर्व धर्माची शिकवण दिली, नेहमी मानवताधर्माचा अवलंब केला. ते नेहमी समाजाभिमुख शिक्षणासाठी प्रयत्नशील राहिले. विद्यार्थ्यांच्या हिताला कुटुंबापेक्षाही जास्त प्राधान्य दिले. बापूजींचे हे कार्य म्हणजे तत्कालीन परिस्थितीविरुद्ध दिलेला लढा होता. बापूजी सतत न्यायासाठी लढत राहिले. अनेक यातना सहन केल्या. हे कार्य करीत असताना त्यांनी मानवतेचे तत्त्वज्ञान स्वीकारले. शिक्षणक्षेत्रातील मक्तेदारी आपल्या कार्यातून मोडून काढली. बापूजींच्या या कार्यातून महाराष्ट्रात हजारोंना नोकऱ्या मिळाल्या, लाखोंचे संसार उभे राहिले, दीनदलितांना शिक्षणाच्या संधी प्राप्त झाल्या आणि म्हणूनच आपण बापूजींप्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बापूजींच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या गुड - बेटर - बेस्ट या प्रवासामध्ये संस्थेला बेस्ट करण्याची जबाबदारी ही तुमची आमची आहे, त्या प्रती विद्यार्थी, शिक्षक यांनी सतत जागृत राहिले पाहिजे असे ते म्हणाले.
अध्क्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. एल. भोसले होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी बापूजींनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकताना बहुजनांसाठी केलेल्या कार्याचा उहापोह केला. तसेच तरुणांनी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे असा मार्गदर्शनपर सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. स्वाती हाके यांनी केले आभार डॉ. अर्चना जाधव यांनी मानले, तर सूत्रसंचालन सौ. श्रुती परचुरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी आभासी पद्धतीने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा