Breaking

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

*कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात गझल कार्यशाळा संपन्न : गझलकारानी केले अभ्यासपूर्ण मार्गदर्शन*


शहाजी कॉलेजमध्ये गझल कार्यशाळा संपन्न


*हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी*


कोल्हापूर ता. ११, मानवी अस्तित्वाचा अर्थ सांगणे ही साहित्यिकांची जबाबदारी असते.आणि तो अर्थ सांगणे हे सहजसोपेही नसते.निसर्गाच्या प्रत्येक कृतीत कविता जन्म घेत असते.त्यातील काव्य जाणवायला एक संवेदनशील मन असावे लागते. व्यक्तिगत भा  वभावनांबरोबरच सामाजिक, आर्थिक, राजकीय ,सांस्कृतिक स्वरुपाचे भाष्य करणे हे साहित्याचे कर्तव्य असते.गझलेने आणि गझलकारांनी ते समर्थपणे केले आहे.असे मत  " हिंदी आणि मराठी गझल : स्वरूप - संवाद - प्रस्तूतीकरण "या विषयावरील एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने,  शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आणि दे.भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स क्लस्टर व शहाजी महाविद्यालयाचा हिंदी विभाग यांच्या सहकार्याने या एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत डॉ. आरिफ महात, प्रसाद कुलकर्णी व डॉ. नदीम शेख यांनी मांडणी केली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण होते. स्वागत प्रा.डॉ. सौ. एस. एस. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.अरुण कांबळे यांनी केले.

       प्रा.डॉ.आरिफ महात यांनी 'गझल कशी तयार होते 'या विषयावर बीजभाषण केले. त्यांनी भाषा ही केवळ शिकण्याची नव्हे तर आत्मसात करण्याची बाब असते.गझल हा काव्यप्रकाराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे.गझल हा एक काव्यप्रकार असून  वजन, रदीफ, काफिया, मिसरा,शेर ही वैशिष्ट्ये सांभाळून ती लिहिली जात असते. एका अर्थाने गझल ही जीवन भाष्य असते हे स्पष्ट केले.

          प्रसाद कुलकर्णी यांनी ' भावनांची उत्कट अभिव्यक्ती म्हणजे गझल 'या विषयाची मांडणी केली.ते म्हणाले ,उत्कृष्ट रचना, तंत्रशुद्धता, कमीत कमी शब्दात व्यापक आशय घनता ही गझलेची वैशिष्ट्ये आहेत. मराठी संत, पंत आणि तंत कवितेने छंदोबद्धता जपलेली आहे. वेदना आणि संवेदनेतून गझला निर्माण होत असतात.अपूर्णतेत नवनिर्मितीची बिजे असतात. अंकुरणे सहज सोपे असल तरी त्यासाठी बीजाला आतून तडकावे लागते. त्यातूनच भावनांची उत्कट अभिव्यक्ती शेरांच्या व गझलेच्या रूपाने बाहेर पडते.

      प्रा.डॉ.नजीम शेख यांनी ' हिंदी- मराठी गझल: सामाजिक संदर्भ ' या विषयाची मांडणी केली. गझलेने केवळ पारंपरिक विषय हाताळले नाहीत तर जागतिकीकरणा पासून वाढत्या धर्मांधतेपर्यंत आणि विषमते पासून सामाजीक  सलोख्यापर्यंत सर्व विषय मांडलेले आहेत.त्यांनी मिर्झा गालिब, दुष्यंतकुमार, सुरेश भट यांच्यासह अनेक गझलकारांच्या शेरांचे दाखले देत सामाजिक संदर्भ अधोरेखित केले.या कार्यशाळेत सर्वच वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

      या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.एस. पाटील यांनी केले. आभार प्रा.ए.आर. कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन कार्यशाळेत क्लस्टर योजनेअंतर्गत विविध कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद तसेच गझलकार,गझल अभ्यासक ,रसिक सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा