Breaking

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

*अकिवाटचे सुप्रसिद्ध अर्धांगवायू विशेषज्ञ व समाजभूषण वसंत गायकवाड यांचे दुःखद निधन ; अकिवाटचा ध्रुवतारा निखळला*


वसंत गायकवाड यांचे दुःखद निधन

       अकिवाटला वैद्यकीय क्षेत्रात अगदी राज्यस्तरा बरोबरच देश पातळीवर ओळख प्राप्त करून देणारे, अर्धांगवायू रुग्णांना नवसंजीवनी प्राप्त करून देण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे अर्धांगवायू विशेषज्ञ  श्री वसंत रामू गायकवाड यांचे कांही दिवसांपूर्वी निधन झाले.

     पंचावन्नहुन अधिक वर्षापासून चालत आलेली अर्धांगवायू बाबतीत वैद्यकीय सेवेच्या परंपरेवरचा विश्वास समाजभूषण वैद्य वसंत दादांनी आणखीनच सदृढ केला.अकिवाटकर कोठेही बाहेर गावी गेले आणि 'कोणतं गाव?' असे विचारल्यानंतर 'अकिवाट' म्हणून सांगितलं की, 'लकवा औषध देत्यात तेच गाव काय?' हे वाक्य पर्मनंटच.गायकवाड यांच्या औषधाचे गुणाची  प्रचिती त्यांच्या प्रसिद्धी  वरूनच होते. वसंतराव यांनी त्यांचे वडील रामू गायकवाड यांचा वैद्यकीय वारसा यशस्वीपणे पूढे चालविला.

    अर्धांग वायू च्या उपचारासाठी अकिवाटला खूप दुरून लोक येतात. त्या येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना गायकवाड यांच्या औषध केंद्राचा पत्ता सांगणे ,हा अकिवाटकरांच्या दिनचर्येचा एक छोटासा भागच म्हणावा लागेल आणि जर एखादा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रात्री अपरात्री आले तरीही त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था गायकवाड यांच्या कडून केली जायची. त्याचबरोबर रुग्णांशी आपुलकीने बोलण्यामुळे रुग्णांबरोबरच सर्वच लोकांशी त्यांचे एक ऋणानुबंध तयार करण्यात ते यशस्वी झाले होते.

    अतिशय प्रभावी औषध आणि योग्य उपचाराच्या जोरावर वसंत गायकवाड यांनी अजतागायत अगणित रुग्णांना बरे करुन , जीवनाची नवी उमेद मिळवून दिली. त्यामुळेच ते इतके प्रसिद्ध बनले.गोरगरीब लोकांना सुद्धा परवडेल एवढ्या किंमतीत त्यांनी अगदी प्रभावी औषध देवून समाजसेवेत आपला वाटा उचलला.

        आपल्या वैद्यकीय कार्यकिर्दीत महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणार  समाजभूषण पूरस्कार त्यांना मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याच बरोबर रोटरी क्लबचा अकिवाट ग्रामभूषण पुरस्कार, तालुका पत्रकार संघाचा वैद्यरत्न पुरस्कार, दैनिक जनमत तर्फे आरोग्यदूत पुरस्कार याच बरोबर अगणित पूरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. आयुष्यभर 'रुग्ण  सेवा हीच ईश्वर सेवा' हा ध्यास घेऊन समाजात मनोमनी आपला ठसा उमटविला. 

       विशेष म्हणजे आर्थिक वैभव आणि समाजिक लौकिक प्राप्त असून सुद्धा त्याचं राहणीमान अतिशय साधं होतं. त्यांच्या वागणुकीत नम्रता आणि प्रामाणिकपणा झळकून येत असे.त्यांचं निधन 10 जानेवारी 2022 रोजी झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 69 वर्षाचे होते. 

त्यांचं इहलोकीचा प्रवास सर्वांच्याच मनाला चटका लावणारा आहे.वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाप्रती ते नेहमीच अकिवाट व संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांच्या मनात त्यांचं स्थान अबाधीत राहील.

         

   *जय हिंद न्यूज नेटवर्क परिवारातर्फे अभिवादन*


*लेखन : प्रा. अमोल सुंके आणि आदिनाथ पाटील*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा