राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रसाद कुलकर्णी |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
रुकडी ता.२५ ' संसदीय लोकशाहीमध्ये खरे लोकसत्ताक राष्ट्र प्रस्थापित व विकसित होण्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही मतदार केंद्रित झाली पाहिजे. मत ही अतिशय विचारपूर्वक देण्याची बाब आहे. ती क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन अंधश्रद्धा, भूलथापा, आमिषे ,जात -धर्म या आधारावर देण्याची वस्तू नाही. तसेच मत ही दान करण्याची बाब नसून तो विचारपूर्वक बजावण्यासाठी राज्यघटनेने दिलेला महत्वाचा अधिकार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पाठोपाठ आपला लोकसत्ताक दिनही येत असतो. यातील अन्वयार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. हीच राष्ट्रीय मतदार दिनाची नवमतदार व सर्व मतदारांकडून अपेक्षा आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आणि ' प्रबोधन प्रकाशन ज्योती 'मासिकाचे संपादक मा.प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या राजर्षी शाहू कला-वाणिज्य महाविद्यालय,रुकडीच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ' राष्ट्रीय मतदार दिन ' या विषयावर बोलत होते.
महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. गिरीश मोरे यांनी केले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, 'भारतीय संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान मंजूर केले. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद होते. तर संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.या संविधानातील कलम ३२४ नुसार २५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना केली गेली. आणि २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली.त्यातून भारतात संसदीय लोकशाही व्यवस्था सुरू झाली.
संसदीय लोकशाही व्यवस्थेत मतदारांची उदासीनता व्यवस्थेला व संविधानाला धोक्यात आणू शकते.लोकशाहीच्या संरक्षणासाठी निवडणुका हे प्रभावी शस्त्र असते. त्यामुळे मताचा अधिकार जबाबदारीने बजावणे अवश्यक असते. निवडणूक ही उमेदवार केंद्रित न राहता , ती मतदारकेंद्रित राहणे ही सर्वांगीण विकासासाठी आवश्यक गोष्ट असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते, 'हुकुमशाहीमध्ये दमनाची भीती असते तर लोकशाहीमध्ये प्रलोभनाची भीती असते.' म्हणूनच लोकशाही सक्षम करायचे असेल तर आपण मतदार म्हणून कोणत्याही प्रलोभनापासून दूर राहून सद्सद्विवेक बुद्धीने मताचा अधिकार बजावला पाहिजे. मतदार जागृत होत गेला तरच लोकाभिमुख राज्यकारभार करण्याची राज्यकर्त्यांना कर्तव्य वाटेल.म्हणून मतदार जागृतीची गरज आहे.' प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात या विषयाची सखोल मांडणी केली.
अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.प्रशांतकुमार कांबळे यांनी संसदीय लोकशाहीमध्ये मतदार आणि मताचा अधिकार यांचे कसे व किती महत्व असते हे अधोरेखित केले.आभार प्रा. डॉ.अशोक पाटील यांनी मानले. प्रा.अमर बुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा