मराठी भाषा पंधरवडा निमित्त मार्गदर्शन करताना डॉ. मांतेश हिरेमठ |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
रूकडी : मराठी भाषेचे उत्तम ज्ञान मिळविले तर मराठी विषयाच्या विद्यार्थ्याला सर्वच क्षेत्रात रोजगार मिळू शकतो, यासाठी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे, मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणाऱ्याला सूत्रसंचालक, दूभाषिक, आकाशवाणीवर निवेदक, विविध क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेणे, बातमी तयार करणे, रेडिओ जॉकी, विविध दैनिकांचे प्रतिनिधी, अभिनय, संवाद लेखन, जाहिरात लेखन, कथांचे लेखन, विविध दैनिकांसाठी अग्रलेख, पटकथा लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक, टंकलेखन, किर्तन, व्याख्यान,वक्त्तृत्व अशा विविध क्षेत्रात मराठीचे उत्कृष्ट ज्ञान असणाऱ्याला सहजपणे रोजगार मिळू शकतो, असे मत देशभक्त्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय चिखलीचे डॉ. मांतेश हिरेमठ यांनी व्यक्त्त केले.ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्यावतीने " मराठी भाषा संवर्धन पंधरवडा " निमित्त आयोजित केलेल्या ' मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी ' या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांतकुमार कांबळे होते.स्वागत व प्रास्ताविक डॉ.लता मोरे यांनी केले. सुरुवातीस शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश दुकळे यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.प्रशांतकुमार कांबळे म्हणाले मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व असेल तर कोणत्याही क्षेत्रात रोजगार मिळू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने मराठी भाषेचे उत्तम ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे आभार डॉ.शंकर दळवी यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. गिरीश मोरे यांनी केले ऑनलाइन संपन्न झालेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा