कोल्हापुरात भोंदू महिलेचा पर्दाफाश |
*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*
कोल्हापूर : अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अनेकांना फसवित या महिलेने अनेक घटकांना गंडा घातला होता. तुमच्यावर करणी झाली असून फार मोठं संकट ओढावणार आहे यासाठी तुम्हाला होमहवन करावे लागेल यासाठी ₹ ५०००/- स्वीकारून भोंदूगिरी करणाऱ्या सृष्टी राजेश मोरे (वय ४०, शाहूपुरी) या महिलेवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला.तिच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले याची फिर्याद महिला पोलिसाने दिली आहे.
कोल्हापूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सीमा पाटील आणि गीता हासूरकर यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे हा प्रकार उघडकीस आणला. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस प्रशासनाच्या मोठे अधिकाऱ्यांनी दिलेला नैतिक पाठिंबा व सहकार्य यामुळे हे शक्य झाले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सृष्टी मोरे शाहूपुरी कुंभार गल्लीत राहते. ती अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत असल्याची माहिती पाटील आणि हासूरकर यांना मिळाली होती. माहिती घेतली तेव्हा मोरे लोकांची नजर व चेहरा पाहून भविष्य सांगते हे समजले.त्यानंतर घटनास्थळावर पंचांसह साध्यावेशात भेट दिली. यावेळी ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर संशयित मोरेला ताब्यात घेतले. सरकार पक्षातर्फे महिला पोलिस कर्मचारी सुप्रिया चौगले यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांनी ओळखीच्या व्यक्तीने १२ तोळे सोने व तीन साडतीन लाख रुपये घेतले आहेत. ते परत देत नाहीत, ते परत मिळतील अशी विचारणा केली असता, त्या वेळी संशयित आरोपी सृष्टी मोरे यांनी उद्या होमहवन करू असे सांगितले. त्यानंतर तुमचे दागिने व पैसे परत मिळतील.यासाठी तुम्हाला २५ हजार रुपये द्यावे लागतील,' असे मोरे हिने सांगितले.त्यावर सीमा पाटील यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. सीमा पाटील व गीता हासूरकर यांनी पोलिसांना घेऊन सदर स्टिंग ऑपरेशन केले.
या स्टिंग ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी सृष्टी मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे होमहवनसाठीचे साहित्य व पैसे घेऊन सीमा पाटील आणि गीता हासूरकर मोरेच्या घरी गेल्या.पैसे आणि साहित्य देऊन होमहवनाची तयारी सुरू असताना पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील व पथकाला खात्री करण्याचे आदेश दिले.
अंनिसच्या या महिला टीमने पोलीस प्रशासनाने पाठिंबा दिल्यामुळे हे शक्य झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
यशस्वी स्टिंग ऑपरेशन व सदर संशयित आरोपीला पकडल्यानंतर कोल्हापूर शहर व जिल्ह्यात चोरून भोंदूगिरी करणाऱ्या घटकांचे धाबे दणाणले आहेत. यानिमित्ताने परिस्थितीसमोर अगतिक झालेल्या लोकांनी अशा भोंदूगिरी करणार्या लोकांच्या जाळ्यात फसू नये. त्याचबरोबर अशा भोंदूगिरी करणार्या लोकांचा पर्दाफाश करून अशा लोकांना वेळीच रोखले पाहिजे असे आवाहन कोल्हापूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा