Breaking

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

*कोल्हापुरात प्राचार्य सुधाकर मानकर लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न ; "भविष्य घडविण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक ": डॉ. बी.एम.हिर्डेकर*

 

प्रा. सुधाकर मानकर लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा


*प्रा.डॉ.प्रभाकर माने  : मुख्य संपादक*


कोल्हापूर :  सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत, शैक्षणिक चळवळीचे व कायद्याचे अभ्यासक प्राचार्य सुधाकर मानकर लिखित 'कौशल्य विकास तंत्रे व पद्धती' या सर्वसमावेशक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात माजी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर प्रसंगी किशोरराव ठाकरे, प्रकाशक मंदार फडके व प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


       सुरुवातीस  माजी प्राचार्य सुधाकर मानकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनस्वी स्वागत करून पुस्तक प्रकाशन सोहळाचा हेतू स्पष्ट केला.

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे हे अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत मात्र प्रा. सुधाकर मानकर व त्यांच्या लेखणीचे भरभरून कौतुक करणारे तसेच या पुस्तकाच्या सर्व पातळीवर विवेचन करणारे सात पानांचे उत्तम  भाषण त्यांनी लिहून पाठवले. पुस्तकाबाबत ते म्हणाले, सध्याच्या स्पर्धेच्या काळात टिकून राहायचे असेल तर गुणवत्ता आणि कौशल्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या आत्मसात करण्यासाठी सर्वांनी मानकर सरांचे हे पुस्तक आवर्जून वाचावे इतके ते मोलाचे आहे. तसेच त्यांनी पुढील लेखन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    मा. किशोरराव ठाकरे, वरिष्ठ व्यवस्थापन हिंदूजा इन्फोटेक पुणे याने पुस्तकाबाबत आपलं मनोगत व्यक्त करताना सद्य परिस्थितीत  व भविष्यातही या पुस्तकाचा सर्वांना उपयोग होणार आहे. या ग्रंथातील २० प्रकरणे व ३६५ पानांचा विपुल पद्धतीने माहिती देणारे  हे पुस्तक प्रत्येक घटकाला त्याच्या करियर वळणावर उपयोगी पडणार आहे.

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य बी.एम. हिर्डेकर यांनी सुधाकर मानकर लिखित आजपर्यंतच्या सर्व पुस्तकांचा उल्लेख करीत 'कौशल्य विकास तंत्रे व पद्धती' हे पुस्तक खऱ्या अर्थाने  व यथार्थ मार्गदर्शन करणारे एक परिपूर्ण पुस्तक असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "पदवीपेक्षा कौशल्य अधिक महत्वाचे आहे. ज्ञान व माहिती असून चालत नाही तर विविध कौशल्ये ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी व यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहेत." केंद्र व राज्य शासनाचे सर्व उपक्रमांची माहिती देणारे सदर पुस्तक विद्यापीठ व महाविद्यालयांना उपयोगी पडणारे आहे. या पुस्तकातील प्रकरणाबाबत त्यांनी सकल मार्गदर्शन केले. आजच्या काळात टिकून राहायचे असेल तर या पुस्तकाचा उपयोग सर्व घटकांनी करून घ्यावा असेही ते म्हणाले. आणि सुधाकर मानकर यांना पुढील लेखन कार्यास शुभेच्छा दिल्या.

         अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.आर.के.शाणेदिवाण म्हणाले, डॉ. सुधाकर मानकर यांच्याकडे उच्च कोटीचा संयम व स्वयंशिस्त असल्याने त्यांच्या कामाच्या पद्धतीला योग्य पद्धतीच्या संस्काराची जोड असते त्यामुळे त्यांनी आजतागायत १६८ पुस्तके  प्रकाशित करु शकले. प्रकाशित झालेल्या पुस्तकाबाबत ते म्हणाले, उत्तम शब्द,सरळ वाक्य रचना व वाचकाला समजेल उमजेल अशी सोपी सुटसुटीत भाषा अशा वैशिष्ट्याने परिपूर्ण असलेले हे पुस्तक आहे. त्यामधील ताणतणावाचं व्यवस्थापन हे प्रकरण कोणत्याही वयातील कोणत्याही व्यक्तीला खऱ्या अर्थाने उपयोगी पडणारा आहे असेही ते म्हणाले.

       या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाशक मा.मंदार फडके यांनी केले. ते म्हणाले, फडके प्रकाशनाशी  मानकर सरांचा संबंध गेल्या ४५ वर्षांपासून आहे. सरांनी यापुढेही असंच पुस्तकाचं लिखाण करून फडके प्रकाशनाशी ऋणानुबंध ठेवावेत.

      या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन प्रा.डॉ.पांडुरंग पाटील यांनी केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील सर्व स्तरातील मान्यवर घटक उपस्थित होते. हा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्तम व व्यवस्थितरित्या संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा