Breaking

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

मराठी अभिजात भाषा आहेच


मराठी भाषा - अभिजात भाषा

प्रसाद माधव कुलकर्णी  (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट

समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी

ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर

पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)


       २७ फेब्रुवारी हा दिवस प्रतिभावंत कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिन असतो.हा दिवस ' मराठी राजभाषा दिन ' म्हणून साजरा केला जातो.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी गेले दशकभर सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांन केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला. 

महाराष्ट्राचे भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किसन रेड्डी यांची भेट देऊन २७ फेब्रुवारीला मराठीला अभिजात भाषा जाहीर करावी अशी मागणी केली. केंद्रीय मंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच मराठीच्या अभिजाततेच्या मागणीचा अहवाल हा परिपूर्ण आहे. भाषातज्ज्ञांनी शिफारस केल्यावरून तो केंद्राने मान्य केलेला आहे.याबाबत विविध खात्यांचे अहवालही सकारात्मक आहेत .त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असे सांगितले आहे.त्यामुळे मुळात अभिजात असलेली मराठी भाषा आता सरकारी मान्यता मिळून अधिकृतपणे अभिजात म्हणून जाहीर शक्यता निर्माण झाली आहे.जी प्रत्येक मराठी व मराठी प्रेमी माणसाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

      ०१२ साली  महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारला अहवाल सादर करावा यासाठीची ही समिती होती.ज्येष्ठ विचारवंत मा. हरी नरके या समितीचे समन्वयक होते. या समितीने फेब्रुवारी २०१३ मध्ये आपला अहवाल सादर केला. तो अहवाल मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठीचा भरभक्कम स्वरूपाचा दस्तऐवज आहे.

        अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात.(१)  त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात. ते किमान दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे असावे लागतात.(२) काळाच्या ओघात भाषा बदलली असेल पण तिचा गाभा ,चौकट बदलता कामा नये. वेगवेगळ्या काळात भाषेची संपूर्ण वेगळी रुपये असू नयेत.(३)भाषेतील साहित्य अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे असावे.(४)इतर भाषांचा प्रभाव चालेल, पण ती स्वतंत्र भाषा असावी. हे चारही निकष मराठी भाषा पूर्ण करते असे सज्जड पुरावे या समितीच्या अहवालात दिलेले आहेत. आज भारतात तामिळ, तेलगू ,कन्नड आणि संस्कृत या चार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे.त्यांच्या जोडीला आता मराठीचा समावेश होण्याची गरज आहे.

      प्रा. रंगनाथ पठारे समितीने एक हजारांवर ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट आदींचा संदर्भ देत मराठीचे अभिजातपण सिद्ध केलेले आहे. त्यातील ठळक बाबी आपणही जाणून घेतल्या पाहिजे. उदाहरणार्थ मूळ विदर्भातील वाशीमच्या असलेल्या गुणाढ्य नावाच्या व्यक्तीने पंजाबात जाऊन 'बृहत्कथा 'हा ग्रंथ 'पैशाची 'या प्राकृत भाषेत लिहिला. दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेल्या या ग्रंथात अनेक प्रकरणे मराठी भाषेतील आहेत. तसेच श्रीलंकेत दोन हजार वर्षापूर्वी 'दीपवंश 'आणि 'महावंश' हे दोन ग्रंथ लिहिले गेले त्यात अनेक मराठी भाषकांचा उल्लेख आहे.तर 'विनयपिटक' या अडीच हजार वर्षापूर्वी उत्तर भारतात लिहीलेल्या बौद्ध ग्रंथात ' महाराष्ट्र ' हा प्रदेश वाचक उल्लेख आहे.

      या अहवालात म्हटले आहे की ,वैदिकपूर्व भाषांमधून संस्कृतचा जन्म झाला तसाच मराठीचाही झाला. जुन्नरच्या नाणेघाटात प्राचीन शिलालेख आढळला आहे. तो ब्राह्मणी लिपीत आणि महाराष्ट्री प्राकृत मध्ये आहे.२२२० वर्षापूर्वीच्या या शिलालेखात मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख 'मराहठीनो ' असा करण्यात आला आहे. संस्कृतपासून प्राकृतभाषा आली आणि त्यातून पुढे मराठी जन्माला आली.या गैरसमजाला यात पुराव्यासहित छेद दिला आहे.प्राकृत मराठी, महारठी,मरहट्टी, देशी, महाराष्ट्रीआणि मराठी असे मराठी भाषेचे वेगवेगळे नामोल्लेख करण्यात आले असले तरी ती एकच भाषा होती हे या अहवालात स्‍पष्‍ट केले आहे.

         मराठीच्या बावन्न बोलीभाषा आहेत. ती जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे.बहात्तर देशात ती बोलली जाते. भारतातील सर्व राज्यात मराठी भाषक आहेत .तसेच मराठीच्या प्राचीनते विषयी विदेशी अभ्यासकांनी केलेली संशोधनेही या अहवालात स्पष्ट केले आहेत. एकूण काय तर आपली मराठी भाषा अभिजात आहेच मात्र तिला केंद्र सरकारकडून अधिकृतपणे तो दर्जा मिळायला हवा. ही तमाम मराठी भाषिकांची, मराठी प्रेमींची मागणी आहे. मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीनेही म्हटले होते की , ' मराठी भाषा जगात दहाव्या क्रमांकावर आहे. जर आपण मराठी भाषा विषयक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली तर ती आणखी व्यापक बनेल. जगातील सर्वश्रेष्ठ भाषा बनण्याची क्षमता आपल्या मराठी भाषेत आहे. 'म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे ही एकमुखी मागणी आहे. मराठीला जर अशी मान्यता मिळाली तर देशभरातील ४५० हून अधिक विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभागाची स्थापना होणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारांना प्रत्येकी पाचशे कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी प्रतिवर्षी मराठी भाषेसाठी खर्च करावा लागणार आहे. त्यातुन ग्रंथालय चळवळीपासून मराठी शाळांपर्यंत साऱ्या विषयांना उभारी मिळणार आहे. तसेच इतरही अनेक लाभ या माध्यमातून होणार आहेत. भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या गतिशील विकासाची हमी असते. 


अभिजात मातृभाषा सर्वामधे मराठी


ओठामधे मराठी, डोळ्यामधे मराठी

असते वहात माझ्या धमन्यामधे मराठी..


शिवबा स्वराज्य स्थापी मुलुखामधे मराठी

हरहर गजर निनादे शब्दामधे मराठी.


प्राचीन काळ सारा नोंदीमधून दिसतो

अभिजात मातृभाषा सर्वामधे मराठी.,


भाषेमुळेच माझा श्रीमंत श्वास झाला

रसपूर्ण होत गेली जगण्यामधे मराठी..


जितकी कठोरआहे तितकीच कोमलांगी

 नांदे सुखात माझ्या हृदयामधे मराठी...


कित्येक शब्द देते,कित्येक शब्द घेते

समृद्ध होत जाते विश्वामधे मराठी..


ज्ञाना तुका जनीचा समृद्ध वारसा हा

ओवी, अभंग,गझला ओठामधे मराठी..


मजला प्रचंड आहे अभिमान मावशांचा

पण पोसते मला ही गर्भामधे मराठी..


वैविध्य राखते ती वाणीत, लेखणीने

नसते कधीच कुठल्या साच्यामधे मराठी..


परसामधे बहरते अन अंगणात खेळे

नसते उभीच केवळ दारामधे मराठी.

 

 माझ्या भुकेस सुद्धा कित्येक अर्थ देते

भाषा भरून आहे पोटामधे मराठी..

 

-----------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा