तीव्र आंदोलन होण्याची दाट शक्यता |
*प्रा. इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
विटा : वीज कनेक्शनच्या प्रश्नावरून शेकडो शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते शंकरदादा मोहिते यांची भेट घेतली. यावेळी आक्रमक झालेल्या शंकरदादा मोहिते यांच्यासह शेकडो शेतकर्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन संदर्भात अनेक तक्रारी असून महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे तसेच मुख्य डीपी बंद करणे असे प्रकार सुरू केले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहांमध्ये तीन महिन्याचे वीजबिल भरण्याबाबत घोषणा केली. असे असतानाही अनेक ठिकाणी महावितरणचा वीज कनेक्शन खंडित करून मनमानी कारभार सुरू आहे. तसेच ज्या ठिकाणी वीज पुरवठा सुरू आहे त्या ठिकाणी दिवसा वीज पुरवठा न करता महावितरणने रात्रीच्या वेळी वीज पुरवठा सुरू ठेवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून संपूर्ण तालुक्यातून आक्रमक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते शंकरदादा मोहिते यांची भेट घेतली व महावितरणाला जाब विचारण्याची विनंती केली.
"कोरोना व दुष्काळ यांच्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून महावितरण मनमानी कारभार करतो आहे त्यामुळे आम्ही उद्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावितरण कार्यालय असा सर्वपक्षीय धडक मोर्चा काढत आहोत. या आंदोलनाची प्रमुख मागणी विज बिल भरण्यात सवलत व वीज तोडणी थांबवणे ही आहे" अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन सामाजिक कार्यकर्ते शंकरदादा मोहिते यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा