छाया - सर्वदमन कुलकर्णी |
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील मजले डोंगर पठारावर असणारी सप्त वर्तुळाकार दगडी संरचना ( Majale puzzle / कोडे) प्रकाशझोतात आली आहे. या दगडी संरचनेला सर्पकुहर असे म्हणतात. ही दगडी संरचना कोकण व घाटमाथा वरील प्रदेशातल्या इसवी सन पूर्व व्यापारी मार्गाचा उलघडा करणारी पुरातत्त्वीय इतिहासाचे संचित असून त्याचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत गोव्याचे इतिहास आणि पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केले.
शिरोळ व हातकणंगले सीमेवर असलेली ही दगडी संरचना ऑगस्ट २०२० मधे जयसिंगपूर येथील पर्यावरण अभ्यासक सर्वदमन कुलकर्णी यांनी कॅमेराबद्ध केली होती. त्यावेळी त्यांना याबद्दल कुतूहल वाटले होते, परंतु २०२१ मधे सांगली येथे सापडलेल्या अशाच कलाकृतीची बातमी व शोधनिबंध पाहिल्यानंतर मात्र त्यांनी कोल्हापूरचे पर्यावरण अभ्यासक रमण कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी यासंदर्भात विशेष काम असणारे गोव्याचे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांची गाठ घालून दिली. व त्यामुळेच आज ही ऐतिहासिक पुरातत्त्वीय कलाकृती प्रकाशझोतात आली आहे.
पूर्वजांनी घातलेले एक अद्भुत कोडे असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. ६८ वर्षीय मायप्पा पुजारी म्हणतात की " मी लहान असल्यापासून मेंढ्या चारायला जात असता हे कोडे पाहतोय, वाढवडीलांपासून ऐकतोय की, हे कोडे पूर्वजांनी तयार केले आहे. त्याच्या संरचनेत कधी ढवळाढवळ केली नाही."
यापूर्वी अशा प्रकारच्या संरचना सांगली जिल्ह्यातील पठारांवरती पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांना आढळल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात विशेष संशोधन केल्यानंतर या कलाकृती भारत रोमदरम्यान इसवी सन पूर्व पासून चालू असलेल्या व्यापारावरती प्रकाश टाकणाऱ्या आहेत, असे शोधनिबंधात नमूद केलेले आहे.
गोव्याचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर येथील पर्यावरण कार्यकर्ते सर्वदमन कुलकर्णी, अक्षय मगदूम, हणमंत न्हावी, मालोजीराव माने यांच्या समवेत नाशिकचे पुरातत्व अभ्यासक सीताराम तोरसकर, गोव्याचे पर्यावरण अभ्यासक विठ्ठल शेळके, गजानन शेट्ये, विठोबा गावडे आदी या शोधमोहीम सहभागी झाले होते.
सदर सर्प कुहरासारखी प्रस्तर चित्ररेखाकृती गोवा येथील कुशावती नदी किनारी रिवण - फणसायमळ येथे आढळली आहे. मजले येथील हे सर्पकुहर कृष्णा नदिखोरे आणि घाटमाथ्यावरील गावांचा ऐतिहासिक रामघाट मार्गातून प्राचीन काळी पश्चिम किनारपट्टी वरून होणाऱ्या व्यापारावर प्रकाशझोत टाकणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे.
मानवी समाजाचअगम्य इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना मजले येथील सर्पकुहर मैलाचा दगड ठरणार असल्याचे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा