Breaking

शनिवार, १२ मार्च, २०२२

*२ एप्रिलला स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्काराचे वितरण ; शरदचंद्र पवार आणि अशोक बंग यांचा होणार सन्मान*

 

डॉ. आप्पासाहेब सा रे पाटील समाजभूषण पुरस्काराचे मानकरी


शिरोळ प्रतिनिधी : गणेश कुरळे 


 शिरोळ : श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार, माजी आमदार, सहकारमहर्षी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्काराचे वितरण शनिवार दि. २ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता दत्त कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार आणि अशोक बंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष, साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाठ आणि निमंत्रक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

     यावेळी बोलताना विनोद शिरसाट म्हणाले, शिरोळ आणि परिसरातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या स्वायत्त व समृद्ध व्हावा हा ध्यास घेऊन स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हे सात दशके कार्यरत होते. त्यांनी शेती, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रात विविध संस्थांची निर्मिती करून उल्लेखनीय कार्य केले. दि. १ एप्रिल २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी दरवर्षी एका महनीय व्यक्तीला स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले जाते.  यापूर्वी ज्येष्ठ पुरोगामी नेते स्व. प्रा. एन. डी. पाटील,  माजी विधानसभा सदस्य स्व. गणपतराव देशमुख, माजी मंत्री व तत्त्वनिष्ठ राजकारणी स्व. बी. जे. खताळ पाटील, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि महिला उद्योजिका चेतना गाला सिन्हा यांना पुरस्कार देऊन सन्मानित सन्मानित करण्यात आले.

     पुरस्कार निवड समितीने सन २०२० सालच्या पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्यात शाश्वत शेती आणि ग्रामस्वराज्य, स्वयंपूर्ण खेडी, दारूबंदी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या अशोक बंग यांना तर सन २०२१ मध्ये स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरदचंद्र पवार यांना पुरस्कार देण्याचे निश्चित केले होते. सन २०२० व २०२१ यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी दोन्ही वर्षाच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सभारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करून गौरविले जाणार आहे. सदर पुरस्कार शनिवार दि. २ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावरील कै. दत्ताजीराव कदम क्रीडांगण येथे समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.  हा पुरस्कार वितरण सोहळा सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी ॲग्रोवनचे माजी संपादक निशिकांत भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


     यावेळी बोलताना श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे आचार, विचार आजच्या पिढीला समजावेत यासाठी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार वितरण सोहळा प्रत्येक वर्षी दिमाखात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे पुरस्कार वितरण सोहळा झाला नाही. यामुळे या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा चांगल्या पद्धतीने करून पुरस्कार प्राप्त माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरदचंद्र पवार व अशोक बंग यांना सन्मानित केले जाणार आहे. 

 अंनिसचे प्रमुख हमीद दाभोळकर यांनी आपल्या मनोगतातून स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्व. सा. रे. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

 अंबादास नानिवडेकर यांनी १ एप्रिल रोजी दत्त आरोग्य केंद्रामार्फत दिवसभर सर्व रोग आरोग्य शिबिर आयोजित केले असल्याचे सांगून याचा लाभ   रुग्णांनी घ्यावा असे आवाहन केले. जयसिंगपूरचे नगरसेवक सर्जेराव पवार यांनी आभार मानले.

    यावेळी दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक दरगू गावडे, दत्त ग्राहक भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, जयसिंगपूरचे उद्योगपती अशोकराव कोळेकर, माजी नगरसेवक मुसा डांगे, मिलिंद शिंदे, प्रा. मोहन पाटील, रुस्तम मुजावर, नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच अनंत धनवडे, औरवाडचे सरपंच अशरफ पटेल, माजी गट विकास अधिकारी आर. बी. जोशी, दत्त कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगाना, विश्वजीत शिंदे, सचिव अशोक शिंदे,  जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादासो काळे, डॉ. कुमार पाटील, डॉ. डिग्रजे यांच्यासह स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे  पाटील सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा