Breaking

शनिवार, २६ मार्च, २०२२

*लोकसत्ताकाचे संवर्धन करणे हाच खरा संकल्प ; प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन*

 


*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


रुई  : १८५७ ते १९४७  या नव्वद वर्षाच्या स्वातंत्र्य आंदोलनात टिळक आणि गांधी ही दोन युगे महत्वाची होती.त्याचबरोबर सुभाष बाबू ,भगतसिंग यांच्यासह अनेकांचे नेतृत्व व कर्तृत्व आणि हजारोंचे बलिदान यातून स्वातंत्र्य मिळालेले आहे. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ' म्हणणारे टिळक आणि सत्याग्रहाचे सामर्थ्य वापरून ब्रिटिशांना' चलेजाव ' व भारतीयांना 'करा अथवा मरा ' हा अंतिम आदेश देणारे गांधींजी यांचे योगदान जगन्मान्य आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यघटना तयार केली.या राज्यघटनेने भारताला लोकसत्ताक म्हणून जाहीर केले. या लोकसत्ताकाने तमाम भारतीयांचे संरक्षण ,संगोपन व संवर्धन करण्याची केलेली प्रतिज्ञा हाच भारतीय स्वातंत्र्याचा मुख्य आशय आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना तो आशय जपणे व पुढे नेणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे ,असे मंत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार  शिबिरात बोलत होते.अध्यक्षस्थानी बी.बी.हुपरे होते.स्वागत प्रा.डॉ.एस.जे.वेल्हाळ यांनी केले. ऋत्विक यांनी प्रास्ताविक केले. गीता यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा.ए.एस.कटकोळे, प्रा.डी.जे.मुंगारे ,डॉ.एस.बी.बेंद्रे मंचावर उपस्थित होते.प्रारंभी दीपप्रज्वलन करून महामानवांना पुष्पहार अर्पण  करण्यात आला.

      प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  आज होत असताना  स्वातंत्र्याचा आशय आणि संविधाचे तत्वज्ञान अधिक विकसित होण्याची अपेक्षा व गरज आहे. मात्र त्याठिकाणी  जातीअंता ऐवजी जातीबद्धता ,संसदीय लोकशाही ऐवजी एकाधिकारी हुकूमशाही विकृती , धर्मनिरपेक्षते ऐवजी  धर्मांधता व परधर्माचा द्वेष ,संघराज्यीय एकात्मतेऐवजी  फुटीरतावादी विकृतीत वाढ ,समाजवादा ऐवजी देश गिळू पाहणारी माफिया भांडवलशाही, सामाजिक न्यायाऐवजी अन्याय अशी जर वाटचाल होत असेल ती स्वातंत्र्याच्या आशयाशीच  प्रतारणा ठरते.या पार्श्वभूमीवर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी जो अतुलनीय त्याग केला ,धैर्य दाखवले आणि अविश्रांत कष्ट केले तो आदर्श आपण जपायला व जोपासायला हवा. तो नव्या पिढीपूढे सातत्याने ठेवायला हवा. चंगळवाद, भोगवाद,, परावलंबित्व, पराकोटीची विषमता यांनी पोखरून ठेवलेला वर्तमान काळ बदलायचा असेल तर जुन्या आदर्शांचा इतिहास सातत्याने मांडला पाहिजे.आजही करोडोंच्या संख्येने असलेल्या आदिवासी ,गरीब, वंचित ,सर्वहारा जनतेला स्वातंत्र्याची फळे चाखता आलेली नाहीत. त्यामुळे सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करणे व ते स्वातंत्र्य मिळवून उपभोगणे हा स्वातंत्र्याचा अन्वयार्थ  आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रसाद कुलकर्णी यांनी या विषयाची विस्तृत व सखोल मांडणी केली.बी.बी.हुपरे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा