Breaking

सोमवार, २८ मार्च, २०२२

*विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक मूल्यांचे उत्तम रोपण : डॉ. महावीर अक्कोळे*


 एन एस एस शिबिरामध्ये उद्घाटन व मार्गदर्शन करताना डॉ. महावीर अक्कोळे


*प्रा. अक्षय माने  : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


       जैनापूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे -जैनापूर या दत्तक गावी दि.२३ मार्च ते २९ मार्च,२०२२ या कालावधीसाठी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व उद्घाटक म्हणून प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार मा.पद्माकर पाटील होते.

        कॉलेजचे प्र.प्राचार्य प्रा.डॉ. मनिषा काळे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली विशेष श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात झाली. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी मान्यवर घटक व उपस्थित शिबिरार्थीचे  स्वागत करून रासेयो 'विशेष श्रमसंस्कार शिबिरा मध्ये विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती दिली.यानंतर डॉ.अक्कोळे हे स्वयंसेवकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना हे एक राष्ट्रीय संघटना असून ज्या माध्यमातून आपण राष्ट्रीय सेवा, धर्मनिरपेक्षता,भारतीय संविधान जागृती, मतदार जागृती, राष्ट्रचेतना व प्रेरणा, मानवी संवेदनशीलता व सामाजिक मूल्य रुजवू शकतो. यापुढे ते म्हणाले, आज युवकांच्या मध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराची नितांत आवश्यकता आहे. मौजे- जैनापूर याठिकाणी जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आजतागायत केलेले काम कौतुकास्पद असून यापुढेही त्यांच्याकडून अशा सामाजिक कार्य व सेवेची अपेक्षा आहे.

       संस्थेचे सदस्य प्रा. आप्पासाहेब भगाटे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा जोपासणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी जंतू उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्याचबरोबर जैनापूर गावचे माजी सरपंच मा.विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असणारे मा. पद्माकर पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या अशा शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन समाज परिवर्तन व देशाचा विकास होऊ शकतो.मौजे जैनापूर गावच्या सरपंच सौ. संगीता कांबळे अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

          या उद्घाटन शिबिराचे आभार प्रा.डॉ.के.डी.खळदकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन विक्रांत माळी या विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी जैनापूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पाटील, निर्भीड पत्रकार रोहित जाधव, एजाज मुजावर व डॉ. व्ही.बी. देवकर, रघुनाथ माने व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने सदर उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा