58 वा दीक्षांत समारंभ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर |
*प्रा.डॉ.मनोहर कोरे : उपसंपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शनिवार दिनांक ५ मार्च २०२२ राजी सकाळी १०.४५ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील राजर्षी शाहू सभागृहात संपन्न होणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. दिगंबर शिर्के यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले, यंदा विद्यापीठाचे सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौद्धिक व कलाक्षेत्र, एनसीसी व एन एस एस व यामध्ये गुणवत्ता तसेच व्यक्तीमत्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता सर्वसाधारण वर्तणूक व नेतृत्व गुण यासाठी विद्यापीठाचे सर्वसाधारण कौशल्यासाठीचे "भारताचे महामहीम राष्ट्रपती सुवर्णपदक" गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे या गावची कन्या ऐश्वर्या आकाराम मोरे या विद्यार्थिनीला बहाल करण्यात येणार आहे. सध्या त्या शिवाजी विद्यापीठाच्या एम.एस्सी. रसायनशास्त्र भाग -२ या वर्गात शिकत आहे.
एम.ए. अभ्यासक्रमातील हिंदी या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल कुलपतींचे पदक, शिरोळ तालुक्यातील दानोळी गावची कन्या श्रीमती स्वाती गुंडू पाटील या विद्यार्थिनीस बहाल करण्यात येणार आहे. श्रीमती पाटील या कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगलीच्या विद्यार्थिनी आहेत.
डॉ.शिर्के म्हणाले, या दीक्षांत समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असून विद्यार्थिनी या संख्यात्मक व गुणात्मक पातळीवर अभिनंदनास पात्र आहेत.सन १९६४ मध्ये शिवाजी विद्यापीठाचा प्रथम वार्षिक पदवीदान समारंभ संपन्न झाला होता. यावेळी एकूण पदवी प्राप्त विद्यार्थिनींची टक्केवारी अत्यंत कमी १८% इतकी होती. परंतु काळाच्या ओघात पालकांच्या मध्ये झालेले प्रबोधन व त्यांचा पाठिंब्यामुळे विद्यार्थीनीच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होऊन ५८ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक(५२%) आहे. तसेच महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरणाकडे वाटचाल मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पदवीप्राप्त शाखानिहाय विद्यार्थीनी संख्या बी.कॉम.(७८३३)बी.एस्सी.(७०३१) बी.ए.(४५०२) अशी असल्याची माहिती दिली. विशेष करून पीएच.डी.पदवी संपादन करणारे ४६ विद्यार्थिनी आहेत. एकूणच यंदाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थीनीनी बाजी मारली आहे.
सदर पत्रकार परिषदेत प्र कुलगुरू प्रा.डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक मा. गजानन पळसे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा