पंचगंगा जल प्रदूषण समस्या |
*गणेश कुरळे : धरणगुत्ती प्रतिनिधी*
इचलकरंजी: कोल्हापूर परिसरात पंचगंगा नदीपात्रात प्रदूषणाने मृत माशांचा खच दिसून आल्यानंतर आता इचलकरंजी जवळील रूई बंधार्यातही प्रदूषित पाण्याने नदीतील मासे व जैवविविधता जगण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रदूषणामुळे पाण्याची ऑक्सीजन पातळी खाली गेली असल्याने माशांचे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. मासे मेल्यामुळे पाण्याला उग्र वास येत असून या बंधार्यातून पिण्यासाठी पाणी उपसा होत असलेल्या १० ते १२ गावांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न भेडसावत आना दिसत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी इचलकरंजी-शिरदवाड दरम्यानच्या पुलाजवळ मृत मासे आढळून आले होते. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही दखल घेतली नाही.दरम्यान, सोमवारी पुन्हा रूई बंधार्याजवळ मोठ्या प्रमाणात मासे आढळून आले आहेत.मृत मासे बंधार्याला तटल्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यातच भर म्हणून खवय्यांची मासे पकडण्यासाठी धडपड सुरू आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळावरच गुन्हे दाखल करा.पंचगंगा प्रदूषणाचा जाब विचारला, आंदोलन केले, अधिकार्यांसमोर मासे ठेवले की, आंदोलकांवर गुन्हे दाखल करता आणि ज्यांच्या हलगर्जीपणामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत, त्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर काय कारवाई करणार, असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदूषण नियंत्रण मंडळावर कारवाई करा, अशी मागणी केली.
या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.नदीत रासायनिक सांडपाणी मिसळत आहे. यामुळे पंचगंगेचे प्रदूषण वाढून मासे मृत होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीकाठावरील लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. हेच पाणी पीत असल्यामुळे हजारो लोक कॅन्सरसारख्या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. प्रदूषित पाण्याने साथीचे आजार नित्याचेच बनले आहेत. तरीही प्रदूषण करणार्यांवर नियंत्रण मंडळ जुजबी कारवाई करून त्यांना अभय देत आहे.
पंचगंगा नदीचे प्रदूषण तातडीने थांबवण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर दौर्यावर आलेल्या, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यांचा दौरा संपताच दोनच दिवसांनंतर मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले. हे सर्व गंभीर आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सागर शंभूशेटे, जनार्दन पाटील, भीमगोंडा पाटील, पापालाल शेख, इंद्रजित भारमल, शंकर कोरवी, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
नदीकाठाच्या गावांमधील जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा