Breaking

रविवार, १७ एप्रिल, २०२२

‘हिंदी भूषण’ पुरस्कार प्राप्त डॉ. अर्जुन चव्हाण यांची मुलाखत. मुलाखतकार : आसमा बेग – सौंदलगे



सुप्रसिद्ध कवी, 'कवितांबरा' पत्रिकेचे संपादक- संरक्षक श्री केशव जालाना 'भाईजी' यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रा.डॉ.अर्जुन चव्हाण


       जेष्ठ हिंदी साहित्यिक, समीक्षक तसेच शिवाजी विद्यापीठच्या हिंदी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांना काशी विद्यापीठ वाराणसी येथे ‘हिंदी भूषण’ हा सम्मान देऊन नुकतेच गौरविन्यात आले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, उपक्रमशील विभागप्रमुख व उत्कृष्ट संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा तर उमटविलाच परंतू पश्चिम महाराष्ट्रात हिंदी प्रसार माध्यमांचा तुटवडा असून देखील त्यांनी आपल्यातील हिन्दी लेखक, समीक्षक यांना अखंड सक्रिय ठेवले. ते सतत लिहीत राहिले म्हणून आज त्यांच्या नावावर मौलक, समीक्षात्मक, अनुवादित, संपादित अशी 50 – 55 हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाल्याचे दिसते. ही बाब आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारी ठरू शकते. दक्षिण काशी मानल्या गेलेल्या कोल्हापूरच्या व्यक्तिस आपल्या साहित्याच्या बळावर उत्तर काशी मध्ये ‘हिन्दी भूषण’ हा सन्मान मिळतो तो डॉ. अर्जुन चव्हाण यांच्या माध्यमातून आणि कोल्हापूकरांच्या, प्रामुख्याने शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा म्हणून भर पडल्याचे दिसते. या बद्दल त्यांच्याच विद्यार्थी सहायक प्राध्यापिका आसमा बेग – सौंदलगे यांनी साधलेला संवाद :


प्रश्न : सर काशी विद्यापीठ बनारस येथे आपणास ‘हिन्दी भूषण’ इतका मोठा सन्मान देवून गौरविण्यात आले, काय वाटले, मनात कशी भावना होती ?


उत्तर : निश्चितच खूप आनंद वाटला, लेखन कार्यात, साहित्य निर्मितीत रस असल्याने त्यासाठीचा उत्साहही वाढला. तसेच आपली जबाबदारी आणखी वाढल्याची जाणीवही झाली.


प्रश्न : यापूर्वीही आपणास देशात आणि परदेशात पुष्कळ पुरस्कार मिळाले, मॉरिशस हिंदी साहित्य अकादमी सम्मान, साहित्य शिरोमणी सम्मान, हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार इत्यादि. परंतू बनारस सारख्या नामांकित काशी विद्यापीठात झालेल्या सन्मानाचे वेगळेपण काय सांगता येईल ?


उत्तर : पहिलं वेगळेपण म्हणजे दक्षिण काशी म्हटल्या जाणार्‍या कोल्हापूरच्या हिंदी साहित्याकारास माझ्या रूपाने सम्मान मिळाला. माझ्यासह देशातील इतर निवडक 40 साहित्यकारांना सन्मानित केले गेले. त्यामध्ये हिंदीचा गड असलेल्या वाराणसीमध्ये ‘हिंदी भूषण’ साठी आपली निवड होतेय ही गेल्या अनेक वर्षांच्या अखंड साहित्य निर्मितीचं फलित आहे.


प्रश्न : काय स्वरूप होत सदर समारंभाचं ?


उत्तर : सदर सम्मान हा राष्ट्रीय सन्मान समारंभ, राष्ट्रीय चर्चासत्र व साहित्यिक महिफिल अशा तिहेरी उपक्रमातून प्रदान करण्यात आला. ‘विश्व हिंदी शोध संवर्धन अकादमी’ आणि ‘आधुनिक भाषा विभाग, महात्मा गांधी काशी विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ आयोजित केलेला होता. यात ‘नई सदी के स्वर’ भाग दो’ या 157 कवींचा समावेश असलेल्या 1220 पानांच्या बृहद काव्य संग्रहाचे प्रकाशन, पुरस्कार प्रदान आणि गझल, काव्य वाचन अशा भरगच्च समारंभात ‘हिंदी भूषण’ हा सन्मान दिला गेला.


प्रश्न : यासाठी प्रामुख्याने कोणत्या बाबीं विचारात घेतल्या ?


उत्तर : प्रामुख्याने हिंदी गीत, गझल आणि समीक्षेच्या क्षेत्रातील योगदानाचा विचार करून मला हा सन्मान दिला गेला. ‘नई सदी के स्वर’ भाग दो’ या संपादित हिन्दी काव्य संग्रहामध्ये आपल्या देशातील निवडक कवि, गीतकार व गजलकार यांच्या जवळपास एकहजार निवडक साहित्य कृतींचा समावेश आहे. त्यात माझ्याही साहित्य कृतीं आहेत. जेष्ठ साहित्यिक हीरालाल मिश्र ‘मधुकर’ यांनी हे साक्षेपी संपादन केले आहे.


प्रश्न : अत्ता पर्यंतच्या एकूण पुरस्कारां पैकी आपणास कोणता अधिक महत्त्वाचा, मानाचा वाटतो?


उत्तर : सर्वच सन्मान महत्वाचे आणि मानाचे वाटतात. देशात व परदेशात, मिळालेले सन्मान / पुरस्कार आपली जबाबदारी वाढविणारे व प्रेरणा देणारेच वाटतात .


प्रश्न : आपणास ‘अनुवाद चिंतन’ या ग्रंथास सुमारे 25 वर्षांपूर्वी हिंदी साहित्य अकादमीचा पंडित महावीरप्रसाद द्विवेदी पुरस्कार मिळाल्याचे सर्व साहित्य जगताच्या स्मरणात आहे. त्या बद्दल ?


उत्तर : होय, हा पहिला मोठा सन्मान होता. त्याचा मला सार्थ अभिमानही आहे. श्रेष्ठ हिंदी लेखक विष्णुप्रभाकर (दिल्ली) यांच्या हस्ते तो दिला गेला होता.


प्रश्न : भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते देखील सुमारे 20 वर्षांपूर्वी आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तो ही मोठा मानला जातो.


उत्तर : होय, त्यास मी माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आणि मानाचा पुरस्कार मानतो. ‘अनुवाद : समस्याएँ एवं समाधान’ या हिंदी ग्रंथाला तो मिळाला होता आणि देशाच्या मा. पंतप्रधान, तेही साहित्यिक, कवि असलेल्या अटलबिहारी बाजपेयीजींच्या हस्ते दिल्ली येथे सन्मान झाला होता, याचाही नक्कीच अभिमानास्पद वाटतो .


प्रश्न : इतर सन्मान आणि ‘हिंदी भूषण’ यात काय वेगळेपण सांगता येईल ?


उत्तर : इतर जास्तीत जास्त सन्मान / पुरस्कार हे माझ्या हिंदी समीक्षा ग्रंथांसाठी मिळालेत पण ‘हिंदी भूषण’ सृजनात्मक लेखनासाठी विशेषतः हिंदी गझल आणि काव्यासाठी मिळाला आहे. माझ्या सन्मानस उत्तर देताना व मुख्य वक्ता म्हणून बोलताना मी जेव्हा हिदी गझल ऐकवली -


      हर चहरे पे एक चेहरा है यारों ;


      हर कुर्सी पे एक बहरा है यारों !


      ...........................................


     जो अर्से से हैं जमानत पे ‘अर्जुनजी’


     आज उन्हीं के सर पे सेहरा है यारों !


 तेंव्हा या वास्तववादी गझलेस टाळ्यांच्या गजरात जो प्रतिसाद मिळाला तो खूप बळ देणारा वाटतो .    


प्रश्न : हिन्दी विषय घेऊन प्राध्यापक क्षेत्रात कार्यकरण्याची प्रेरणा कशी मिळाली?


उत्तर : प्रामुख्याने दोन प्रेरणा स्थाने म्हणता येतील. वक्तृत्व मध्ये माझी असलेली गती आणि शिक्षण घेत असताना प्रा. गणाचार्य (बार्शी), डॉ. द्रविड, प्रा. चंद्रकांत पाटगावकर, प्रा. शरद कणबरकर, डॉ. सरजू मिश्र आणि डॉ. सुनीलकुमार लवटे ( कोल्हापूर ) यांसारखे मिळालेले गुरु. मार्गदर्शक व त्यांची प्रेरणा.


प्रश्न : पण हिंदी मध्ये संशोधन-लेखन क्षेत्रात घेतलेली झेप या बद्दल काय सांगाल ?


उत्तर : विख्यात हिंदी समीक्षक डॉ. नामवरसिंह, डॉ. नगेंन्द्र (दिल्ली), डॉ. अशोक कामात (पुणे), डॉ.चंद्रकांत बांदिवडेकर (मुंबई) यांच्या कडून संशोधानासाठीचे मिळालेले मार्गदर्शन आणि सृजनात्मक लेखनासाठी ‘हंस’ चे संपादक हिंदी लेखक राजेंद्र यादव (दिल्ली) यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे वाटते.


प्रश्न : आपल्या शैक्षणिक व संशोधांनातील कार्याचा थोडक्यात आढावा द्यावा.


उत्तर : सुरवातीला कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर व पुढे शिवाजी विद्यापीठात 35 वर्षे हिंदी विषयाचा प्राध्यापक, तसेच विभाग प्रमुख म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. चांगले विद्यार्थी, देशाचे चांगले नागरिक घडविण्यासाठी हाथभार लावता आला, राज्यभर आणि देशभर हा गोतावळा पसरल्याचे पाहून अत्यंत आनंद वाटतो. तसेच माझी स्वतःची पीएच.डी. झाल्यानंतर 56 हून अधिक एम.फील., पीएच.डी. चे संशोधक माझ्या मार्गदर्शनाने यशस्वी झाले आणि होत आहेत. देशभरातल्या नामांकित विद्यापीठांतील पाचशे हून अधिक संशोधकांच्या प्रबंधचे परीक्षण करता आले, अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण करता आले. शिवाजी विद्यापीठ या मातृसंस्थेत सेवेची संधी मिळाली त्यामुळेच हे शक्य झाले अशी माझी धारणा आहे.


प्रश्न : तुमच्या यशाचे गमक काय सांगाल ?


उत्तर : अखंड सेवा – श्रम – साधना – सच्चाई . मीच माझा स्पर्धक होतो आणि आहे . दुसरे कोणी नव्हे. साठी ओलांडताना देखील माझ्या पुस्तकांची संख्या आणि माझे वय वर्षे या दोघांमध्ये आंतरिक स्पर्धा चाललेली जाणवते. पाहूया कोण पुढे जाते ?  


प्रश्न : नवोदित लेखक , अभ्यासक , संशोधक, प्राध्यापक यांना आपण काय सल्ला द्याल ?


 उत्तर : मी तरुण पिढी बद्दल खूप आशावादी आहे, त्यांना ‘साध्य’ पर्यंत पोचण्यासाठी खूप ‘साधनं’ उपलब्ध आहेत. गुणवत्तेत वाढ होत चाललेली आहे, उर्जावान तरुण पिढी पुढे येत आहे. पण या सोबतच संधी आणि साधनांचा दुरुपयोगही होताना दिसतोय. त्यांच्या पुढे जेवढी संधी तेवढीच आव्हाने देखील आहेत. त्यातून जात असताना फक्त हुशार, बुद्धिमान असून चालणार नाही तर कष्ट उपसण्याची वृत्ती, नैतिक बळ वाढविता आले पाहिजे. यशाच्या वाटा धुंडाळत असताना “ग्रंथालयांच्या शोधात ‘भूगोल जीवी’ व्हावे लागेल फक्त ‘गुगल जीवी’ नव्हे.” ‘कट पेस्ट’ ऐवजी ‘मूळा पर्यंत थेट’ जाऊन घेता, शिकता आलं पाहिजे. एवढं जरूर सांगेन.


प्रश्न : तरुणांना रोजगाराच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास या बद्दल काय मार्गदर्शन कराल?


उत्तर : विद्यापीठ हे अभ्यास केल्यानंतर पदवी देण्याची हमी देते परंतु नोकरीची हमी देणारे विद्यापीठ जगात नाही. ती त्या पदवी व साध्य केलेल्या कौशल्याच्याच बळावर मिळवावी लागते. संधी प्रत्येक विषयात, क्षेत्रात आहेत, हिंदीत तर आहेतच आहेत, त्यासाठी साधारण नव्हे, विशेष प्राविण्य मिळावावे लागेल आणि परिश्रमाची सिदोरी सोबत घ्यावी लागेल. स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडविण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील काही उतुंग व्यक्तिमत्व शोधून त्यांचे आदर्श समोर ठेवून ध्येयवादी व्हावे लागेल. अपयशाने खचून न जाता त्याला ताकीदीने सामोरे जावून यशाकडे अखंड वाटचाल केली तर येणार काळ आपला आहे.              


                                    आसमा बेग-सौंदलगे

                                     देवचंद कॉलेज, निपाणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा