![]() |
मार्गदर्शन करताना बाबासाहेब नदाफ |
*प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : भारतीय राज्यघटना ही जगातील महान घटना असून ती लोकांच्या समृद्धीला पोषक आहे.म्हणून ती देशाचा महाप्राण आहे. पण सत्तापिपासू लोकांनी तिला धर्माची वाहक बनवल्याने ती आज धोक्यात आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्र सेवादलाचे बाबासाहेब नदाफ यांनी केले.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ आयोजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प.भ.डाॅ. यशकाश्यपायन महाथेरो होते.
नदाफ पुढे म्हणाले, संविधानाच्या प्रास्ताविकेची जरी संपूर्ण अंमलबजावणी केली असती तरी आज देश उत्कर्षाला पोहोचला असता.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील महान संविधान लोकांना समर्पित केले पण आम्ही काय केले? आज मनूवाद्याच्या ताब्यात देश आहे. ते देशाची म्हणजेच लोकांची मालमत्ता विकत आहेत.भांडवलदारांच्या दावणीला देश बांधला जातोय.माणसापेक्षा धर्म मोठा होताना भोंग्यातच तुम्हाला गुंतवून ठेवल जातय.
संविधानातील समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेमुळे आज देश एकात्म आहे. वाढती महागाई, खाजगीकरण, भांडवलीकरण,अल्पसंख्यांकाना धर्म, जाती वरुन धमकावलं जात असेल तर देश फुटीरतेच्या मार्गावर आहे. जर आपण संविधानाचे रक्षण करु शकलो नाही तर मनूवाद्यी पुन्हा धर्माच्या आधारे विषमता लादतील.
प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष रमेश कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.डाॅ. प्रविण चंदनशिवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांचा सत्कार केला.अध्यक्ष डाॅ. यशकाश्यपायन महाथेरो यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी शिस्तबद्ध पद्धतीने शहरातून शोभायात्रा काढणेत आली.रथामध्ये म.फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा विराजमान होत्या. शुभ्र वस्रातील उपासक- उपासिका व लहान मुलांबरोबर युवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठिकठिकाणी महापुरुषाच्या शोभायात्रेचे शहरवासियांनी स्वागत केले. शोभायात्रा २.३० तास चालली.यावेळी नगरपरिषदेच्या वतीने व पोलिसांच्या वतीने चांगले सहकार्य मिळाले. सांगता समारंभात.सपोनि.राजेंद्र मस्के यांचा सत्कार केला.त्यावेळी त्यांनी माझ्या ३० वर्षाच्या नोकरीमध्ये इतकी शिस्तबद्ध मिरवणूक पहिल्यांदाच पाहत असल्याचे गौरवोद्गार काढले.
या अत्यंत शांततामय व बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष करीत सुरू असलेले शोभायात्रेतील समस्त आंबेडकर प्रेमी बंधू भगिनींचे शिस्त व संस्काराचे जयसिंगपूरकरांनी कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा