![]() |
हुंड्यापायी नवविवाहितीने केली आत्महत्या |
हिंगोली : महाराष्ट्रात आज हुंडा पद्धत काही ठिकाणी छुप्या पद्धतीने व काही ठिकाणी उघडपणे ही पद्धत रूढ आहे. सामाजिक परिवर्तन होत असताना हुंडा पद्धत मात्र अधिक दृढ होत चालली आहे. ज्याला आपली समाज व्यवस्था कारणीभूत असल्याबाबत बोलले जात आहे.
सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून नवविवाहितेने आयुष्याची अखेर केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हाताची मेहंदीही निघालेली नसताना तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. लग्नानंतर अवघ्या १९ दिवशी नवविवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. हिंगोली जिल्ह्यात ही दुर्देवी धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पल्लवीने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. बासंबा पोलीस ठाण्यात सुनीता कऱ्हाळे यांनी पल्लवीचा पती आणि सासू-सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी शहरातील इंदिरा नगरातील सुनीता कऱ्हाळे यांची कन्या पल्लवी हिचा विवाह २५ मार्च रोजी झाला होता. पण पल्लवीला स्वयंपाक नीट येत नाही, तुझ्या माहेरच्यांनी फ्रीजच दिला नाही, शिलाई मशीन दिली नाही, ते घेऊन ये, आम्ही दुसरी मुलगी आणली असती तर आम्हाला जास्त हुंडा मिळाला असता, असं म्हणत पल्ल्वीला तिच्या सासरची मंडळी मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप आहे.
पल्लवीच्या माहेरी विवाह सोहळा असल्यामुळे तिचा चुलत भाऊ तिला घेण्यासाठी मौजा येथे गेला होता. मात्र तिच्या सासरच्या मंडळींनी तिला पाठवले नाही. सासरी होणारा छळ आणि लग्नाला न पाठवल्यामुळे पल्लवीने टोकाचं पाऊल उचललं. घरी कोणी नसताना बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.
या प्रकरणी पल्लवीची आई सुनीता केशव कऱ्हाळे यांनी बासंबा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नामदेव किसन टारफे, किसन टारफे, निर्मलाबाई टारफे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आजही एकविसाव्या शतकात व आधुनिकतेच्या गप्पा मारणाऱ्या या समाजात हुंडा पद्धतीला मात्र आपली संस्कृती समजून जीवन प्रक्रिया सुरू ठेवली जाते हे दुर्दैवी आहे. हुंड्यापायी अजून किती तरुणींचे जीव जाणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा