Breaking

शनिवार, ३० एप्रिल, २०२२

*आत्मनिर्भर भारत हाच भारतीय अर्थव्यवस्थेवरील युद्धाचा परिणाम टाळण्याचा मार्ग : प्राचार्य डॉ.वाघमारे*


विलिंग्डन कॉलेजमध्ये मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.वाघमारे


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


सांगली  : आत्मनिर्भर भारत व भारताची आत्मनिर्भर संरक्षण सिद्धता वाढविणे हे युद्धाला परिणामकारक उपाययोजना म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेने राबवावयाचे धोरण आहे असे प्रतिपादन चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस वि वाघमारे यांनी केले. विलिंग्डन महाविद्यालय व मिरज महाविद्यालय यांच्या अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अभ्यागत व्याख्यानामध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

     नाटो या संघटनेचे सभासदत्व युक्रेनने स्वीकारू नये म्हणून हे युद्ध रशियाकडून युक्रेन वर लादले गेलेले आहे. गेले 62 दिवस चालू असलेल्या या युद्धाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर ही झाल्याशिवाय  राहणार नाही. भारतामध्ये खाद्य तेलाच्या किमती इंधनाच्या किमती धातूंच्या किमती याच्यामध्ये होणारी वाढ हा युद्धाचाच परिपाक होय. या सर्वाचा एकत्रित परिणाम चलन वाढीमध्ये होऊन देशांतर्गत भाववाढ होताना पाहावयास मिळते. भारत हा रशियाचा फार पूर्वीपासून चांगला मित्र असला तरी देखील आज भारताने स्वीकारलेले अलिप्त वादाचे धोरण हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील भूमिकेला धरूनच आहे. अमेरिका इंग्लंड सारख्या विकसित राष्ट्रांनी शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेतून अनेक युद्धना जन्म दिलेला आहे. भारताने मात्र  तटस्थतेचे धोरण स्वीकारून साम्राज्यशाही ला नेहमीच विरोध दर्शविलेला आहे. तरीही या युद्धाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारच आहे जागतिकीकरणामध्ये कोणतीही अर्थव्यवस्था ग्लोबल सप्लाय चेनपेक्षा वेगळी राहू शकत नाही. म्हणून युद्धाचा प्रतिकूल परिणाम कमीत कमी राहण्यासाठी भारताने आत्मनिर्भरता संरक्षण सिद्धता यावर जोर देऊन देशांतर्गत उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे त्यांनी प्रतिपादन केले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलिंग्डन महाविद्यालय सांगली चे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर होते आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी भारताचा मानवी भांडवल गुंतवणुकीचा दर व भारताचे रशियाशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध याचा आढावा घेतला.

   कार्यक्रमाचे नेटके नियोजन विलिंग्डन महाविद्यालय सांगली अर्थशास्त्र विभागाने केले होते. यावेळी दोन्ही महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे विद्यार्थी विविध विषयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. मनोहर कोरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन मिरज महाविद्यालयातील प्रा.विशाल घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.अनिल खर्चे यांनी केले. शेवटी शांतीची आराधना म्हणून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा