Breaking

रविवार, २९ मे, २०२२

गीतांजली श्री यांनी बुकर पुरस्कार मिळवून रचला इतिहास! बनल्या बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला



गीतांजली श्री


      मैनपुरी च्या मूळ निवासी  लेखिका ' गीतांजली श्री ' ने 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकून  इतिहास  रचला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्यां  पहिल्या  भारतीय महिला ठरल्या आहेत.  लेखिका गीतांजली  श्री  यांची ही कादंबरी हिंदीमध्ये 'रेत समाधी ' या नावाने प्रकाशित झाली होती, त्याचा अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला आहे, ज्याचं नाव 'टॉम्ब ऑफ सँड' आहॆ . आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या जगातील 13 पुस्तकांपैकी हे पुस्तक होते. हिंदी भाषेतील ही पहिलीच कादंबरी आहे जी या प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांच्या यादीत होती.गुरुवारी (26 मे) लंडनमधील एका कार्यक्रमात, लेखिका गीतांजली श्री यांना या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला. गीतांजली श्री यांना पाच हजार पौंडची रक्कम मिळाली जी त्या डेजी रॉकवेल यांच्यासोबत शेअर करणार आहेत. 


गीतांजली श्री सोबत अनुवादक डेझी रॉकवेल






     

कोण आहेत गीतांजली श्री ? 

12 जून 1957 रोजी जन्मलेल्या गीतांजली श्री या मूळच्या उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील  आहेत.  वडील अनिरुद्ध पांडे सिव्हिल सेवेत होते,त्यामुळे त्यांचे पालनपोषण उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये झाले. आपल्या नावाला आई 'श्री पांडे' चे  नाव जोडणाऱ्या  गीतांजली चे बालपण उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये  गेले. आज त्यां  दिल्लीत वास्तवास आहेत. लेखिका सांगतात की, लहानपणी इंग्रजी पुस्तके नसल्यामुळे त्यांना  हिंदीची आवड निर्माण झाली आणि लेखनाचा प्रवास सुरू झाला.  मुन्शी प्रेमचंद यांच्या नातीशी असलेली त्यांची घट्ट मैत्रीही त्यांना या प्रवासामध्ये मार्गदर्शक ठरली. दिल्लीत आल्यावर  त्यांनी लेडी श्रीराम येथे पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहासात एमए केले. गीतांजली  श्री नी आधुनिक भारतीय साहित्याचा अभ्यास केला पण त्यांचा कल हा नेहमी  हिंदी साहित्याकडे होता .गीतांजली श्री  यांनी  त्यांच्या  पीएचडीसाठी प्रेमचंद यांच्यावर एक पुस्तक लिहले होतें  जे त्यांच्या  हिंदीतील प्रवेशाचे एक महत्त्वाचे पाऊल त्या मानतात. गीतांजली या  थिएटरसाठीही लिहितात. फेलोशिप्स, रेसिडेन्सी, व्याख्याने इत्यादींसाठी परदेशात त्यांचा दौरा असतो.  लेखिका गितांजली श्री यांच्या' रेत समाधी 'पुस्तकाचं अनुवाद करणाऱ्या डेझी रॉकवेल या चित्रकार आणि लेखिका असून त्या अमेरिकेत राहतात. त्यांनी अनेक हिंदी आणि उर्दू साहित्याचं भाषांतर केलं आहे.


गीतांजलि श्री यांचे लेखन कार्य


       गीतांजली श्री यांनी पाच कादंबऱ्या आणि अनेक कथासंग्रह लिहिले आहेत. त्यांच्या साहित्याचं इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, सर्बियन आणि कोरियन भाषांमध्ये अनुवाद झालं आहेत.

 गीतांजलि श्री ह्या तीन दशकापासून लेखन कार्य करत आहेत. तीस वर्षाच्या त्यांच्या तपश्चर्या मध्ये त्यांची  पहिली कादंबरी  'माई 'ही  होती. 'माई ' या कादंबरीतून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.  या पुस्तकाचे सर्बियन, कोरियन आणि उर्दूसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहे.  या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाला 'साहित्य अकादमी' सन्मानही मिळाला आहे.  याशिवाय श्रीं नी 'हमारा शहर उस बरस' 'तिरोहित' आणि' खाली जगह' या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत ज्यांचे फ्रेंच आणि जर्मन भाषेत भाषांतर झाले आहे.  नुकतीच प्रकाशित झालेली 'रेत की  समाधी' ही कादंबरी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.  कादंबरीशिवाय त्यांनी अनेक कथासंग्रहही लिहिले आहेत. लेखनाव्यतिरिक्त त्यांना  रंगमंचाचीही आवड आहे आणि 1989 पासून त्यां  लेखक, संगीतकार आणि चित्रकारांसोबत काम करणाऱ्या विवादी  नावाच्या  एका रंगमंचाशी जोडल्या  गेलेल्या  आहेत .  गीतांजली यांनी रंगभूमीसाठी अनेक नाटकेही लिहिली आहेत.


 रेत समाधी कादंबरी ( 'टॉम्ब ऑफ सँड')


   रेत  समाधी  या कादंबरीमध्ये 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पती गमावलेल्या 80 वर्षीय विधवा महिलेची कथा आहे. पतीच्या मृत्यूनंतर ती महिला डिप्रेशनमध्ये जाते. खूप संघर्षानंतर, तिने तिच्या नैराश्यावर केलेली मात आणि फाळणीच्या वेळी मागे राहिलेल्या भूतकाळाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय ह्या कादंबरीत दर्शवण्यात आला आहे . राजकमल प्रकाशनाने प्रकाशित केलेलं 'रेत समाधी ' हे पहिले हिंदी पुस्तक आहे ज्याने केवळ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या यादीमध्ये स्थान मिळवलं नाही तर तो पुरस्कारही जिंकला ही .



पुरस्कार स्वीकारताना गीतांजलि श्री चे शब्द आणि भावना  -


      पुरस्कार स्वीकारताना गीतांजलि म्हणाल्या ,मला सांगण्यात आले होते  हे लंडन आहे, तुम्ही सर्व तैयारीनिशी या.   इथे पाऊस पडू शकतो, बर्फ पडू शकतो, ऊन ही असेल किवां कदाचित तुम्हाला बुकर सुध्दा मिळेल. मी तैयार होऊन आले होते पण कदाचित मी तैयार नव्हते. मी भारावून गेले आहे.  मी कधीही बुकरचे स्वप्न पाहिले नाही, मी ते साध्य करू शकेन असे  मला वाटले नाही.  ही एक मोठी उपलब्धी आहे, मी आश्चर्यचकित आहे, आनंदित आहे, सन्मानित आहे आणि  नम्र आहे.  हे पुस्तक पहिल्यांदा पाहणाऱ्या हिंदी-इंग्रजी आणि फ्रेंच प्रकाशकांसह माझे फ्रेंच अनुवादक एनीमांतो यांची  मी आभारी आहे.माझ्या या इथपर्यंतच्या प्रवासामागे हिंदी आणि दक्षिण पूर्व आशियातील इतर भाषांची अफाट साहित्यिक परंपरा आहे. अनुवादामुळे विश्व साहित्य अधिक समृद्ध होईल. या कादंबरीला इंग्रजी रूप देणारी डेझी रॉकवेल नसती तर आपण सगळे इथे नसतोच .

      शेवटी ज्युरी पॅनल म्हणाले ,फाळणीवर लिहिलेली ही अतिशय अनोखी कादंबरी आहे.  या कादंबरीत सर्वकाही आहे. यामध्ये  स्त्री आहे, स्त्रीचे मन आहे, पुरुष आहे, तृतीय पंथ आहेत , प्रेम आहे, नाते आहे, काळ आहे, अविभाजित भारत आहे तर  फाळणीनंतरचे चित्र सुध्दा आहे , जीवनाचा शेवटचा टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये अनिच्छेपासून इच्छेपर्यंतचा प्रवास आहे.   मानसशास्त्र आहे, सीमा आहे, हास्य  आहे, खूप लांब वाक्ये आहेत, खूप छोटी वाक्ये आहेत, जीवन आहे , मृत्यू आणि विमर्श  आहे  जे खूप खोल आहे आणि सगळ्या  गोष्टीं सत्य आहेत .

 बुकर पुरस्कार काय आहे?

       हा पुरस्कार दरवर्षी इंग्रजीत अनुवादित केलेल्या आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाला दिला जातो. 7 एप्रिल रोजी लंडन बुक फेअरमध्ये 2022 पुरस्कारासाठी निवडलेल्या पुस्तकाची घोषणा करण्यात आली होती. तर गुरुवारी (26 मे) विजेत्याची घोषणा झाली .यामध्ये गीतांजली श्री यांच्या रेत  समाधी या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात आला. 

   या पुरस्कारा आधी  गीतांजली श्री यांना दिल्लीच्या हिंदी अकादमीने  2000-2001 च्या साहित्यकार सन्मानाने सन्मानित केले आहे.  1994 मध्ये, अनुगुंज या लघुकथा संग्रहासाठी त्यांना यूके कथा सन्मान प्रदान करण्यात आला आहे . त्यांना इंदू शर्मा कथा सन्मान, द्विजदेव सन्मान देखील मिळाला आहे.  याशिवाय जपान फाऊंडेशन, चार्ल्स वॉलेस ट्रस्ट, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि उच्च अध्ययन संस्था यांच्याकडून फेलोशिप मिळाली आहे. त्या भारतीय संस्कृती मंत्रालय आणि जपान फाउंडेशनशी देखील जोडलेल्या आहेत. त्याचबरोबर  त्यां विवाडी नावाच्या थिएटर ग्रुपशीही देखील कनेक्टेड आहेत .या मध्ये लेखक, कलाकार, नर्तक,चित्रकार,सामील आहेत. गीतांजली यांच्या  माई कादंबरी ला 2001 साली क्रॉसवर्ड बुक पुरस्कारा मध्ये स्थान मिळाले होतें. या कादंबरीचा अनुवाद नीता कुमार यांनी केला होता या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाला 'साहित्य अकादमी' सन्मानही मिळाला आहे. 

      हिंदी च्या लेखिकेला बुकर पुरस्कार सारखा महान सन्मान मिळणे ही हिंदी साहित्यां बरोबर संपूर्ण भारतासाठी सन्मानाची बाब आहे.  गीतांजली श्री यांना खूप खूप अभिनंदन आणि यांच्या पुढील लेखनाला शुभेच्छा.


        लेखप्रपंच -  प्रा. आस्मा बेग - सौंदलगे

प्रा. आस्मा बेग - सौंदलगे या देवचंद कॉलेज, अर्जुन नगर, निपाणी येथे हिंदी विषयाच्या प्राध्यापिका आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा