Breaking

शनिवार, २८ मे, २०२२

हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. प्रा सुनंदा पाटील यांचा विशेष लेख

 



     जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अलौकीक संगम म्हणजे विनायक दामोदर सावरकर.


     नासिक जवळील भगूर येथे सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ ला झाला .लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान असलेले विनायकराव अनेक गुणांची खाणच! वक्तृत्व, काव्यरचना,  जीवनदर्शन घडविणारा नाटककार , राजकीय सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक ,ग्रंथकार ,इतिहासकार ,भाषाशास्त्र आणि लिपिशुद्धी चळवळीचे प्रणेते अशा अनेक उपाधींनी विभूषित! त्यांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिलेत .सावरकर यांच्या साहित्याबद्दल काय बोलणार ?

त्यांचा एक एक शब्द हृदयावर कोरला गेलाय .चाफेकर बंधूंना फासावर चढवलेले बघून त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी 'मारता मारता मरेतो झुंजेन' अशी शपथ घेतली अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी कुलदेवी पुढे! यानंतर "अभिनव भारत " नावाच्या क्रांतिकारी जहाल संघटनेची स्थापना केली .


 त्यानंतर अंदमानच्या तुरुंगात नरक यातना भोगत  'काळे पाणी' सारख्या सुंदर पुस्तकाचं लेखन केलं. भारतीय संस्कृती आणि समाज कल्याणासाठी सावरकरांनी "हिंदुत्व सभा " स्थापन केली अन् त्याचे ते अध्यक्ष बनले...


तुरुंगातल्या भिंती पावन व्हाव्यात अशी घटना म्हणजे , त्यांनी खिळे आणि कोळशाच्या सहाय्याने काव्याच्या दहा हजार ओळी तुरुंगाच्या भिंतीवर लिहिल्या . त्या पाठ केल्या आणि मुक्त झाल्यानंतर त्याचे लेखन केले. किती अफार बुद्धीमत्ता ?


" सागरास " ही कविता ठावूक नाही अशी मराठी व्यक्ती शोधून सापडणार नाही. ही कविता मला मराठी सहावीला होती " . आजही पाठ आहे किंवा या कवितांनी आपली पाठ सोडली नाही.


स्वातंत्र्यदेवीच्या स्तोत्रातील या ओळी माझ्या अत्यंत आवडीच्या . अतिशय सोप्या , तेवढ्याच भिडणाऱ्या .


" *तुजसाठी मरण ते जनन*

*तुजवीन जनन ते मरण*

*तुज सकल चराचर शरण*

*भरतभूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे"*


ही शेवटची ओळ बहुतेक वेळा म्हटली जात नाही


सावरकरांची हिंदूंचे एकतागान ही एक अनवट कविता मला आवडते.


*हिंदूंचे एकता गीत*


तुम्ही आम्ही सकल हिंदू! बंधू बंधू 

तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू !


ब्राह्मण या क्षत्रिय चांग जरी झाला कसलेही रुप या रंग जरी त्याला 

ही एकची आई हिंदूजाती आम्हास तिला वंदू!!


एकची देश हा आपला प्रेमाचा

एकची छंद जीवाच्या कवनाचा

 एकची धर्म हा आम्हा सकलांचा 

 ही हिंदू जातीची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू 


रघुवीर रामचंद्राचा !जो भक्त

गोविंदपदांबुजी जो जो !अनुरक्त 

गीतेसि गाऊनी पूजी !भगवंत 

तो हिंदूधर्मनौकेत बसुनिया तरतो भवसिंधु 


उभयांनी दोष उभयांचे !खोडावे 

द्वेषासि दुष्ट रूढीसी! सोडावे 

सध्यासि आईच्यासाठी! जोडावे

अम्ही अपराधांसी विसरुनी प्रेमा पुन्हा-पुन्हा सांधू !


लेकुरे हिंदू जातीची !!ही आम्ही आमच्या हिंदू धर्मासी! त्या कामी

प्राणही देऊनी रक्षु! परिणामी  

या झेंड्याखाली पूर्वजांच्या एकाची 

नांदू !!


हे वृंद गीत असून महाराष्ट्रभर गायलं जातं तसेच अनेक भाषांमधून हे अनुवादित करण्यात आलं आहे.  1925 ला  रत्नागिरीला हे सर्वप्रथम म्हंटल्या गेलं.


अशा या अखिल भारताला ललामभूत असलेल्या महापुरुषाला विनम्र अभिवादन !

            


             लेखिका - प्रा.सुनंदा पाटील, अध्यक्षा - आम्ही लेखिका

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा