![]() |
सुयेक व माडखोलकर कॉलेज आयोजित व्याख्यानमालेत |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
चंदगड : राजर्षी छ. शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद कोल्हापूर(सुयेक) आणि र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने 'शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाचे खाजगीकरण' या विषयावर शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या (सुयेक) नाविन्यपूर्ण व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान दि. ६ मे २०२२ रोजी यशस्वीपणे संपन्न झाले.
बेळगावचे संवेदनशील मा.प्राचार्य आनंद मेणसे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते, तर सुयेकचे अध्यक्ष डॉ. राहुल शं. म्होपरे हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.
प्रमुख वक्ते मा.प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करून गावोगावी प्राथमिक शाळा सुरू केल्या.१९१७ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा कायदा केला. शिक्षकांसाठी संस्थानातून वेतन दिले. असा राजर्षी शाहू महाराज हे जगातले पहिले असे लोकराजे होते ज्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले, तसेच संस्थानातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विविध वसतीगृहे ही सुरू केली. वेगवेगळ्या जातींच्या मुलांसाठी राजर्षी शाहूंनी कोल्हापुरात वसतिगृह चळवळ उभारली. शिक्षणाबरोबरच संस्थानातील लोकांच्या रोजगाराची सुविधा शाहू महाराजांनी निर्माण केली होती. त्यामध्ये गंगाराम कांबळे यांच्या चहाचे हॉटेल हे एक उत्तम उदाहरण होते. शाहू महाराज स्वतः त्या ठिकाणी जाऊन चहा घेत आणि आपल्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना हि चहा घेण्यास सांगत त्यामुळे सामाजिक जातीभेद नष्ट होऊन सामाजिक सुधारणा मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या. अलीकडे मात्र प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून सर्वच स्तरावर शिक्षणाचे खाजगिकरण करावयाचे आणि या माध्यमातून पुन्हा मनुस्मृतीचे राज्य आणायचे आणि बहुजनांना आणि महिलांना शिक्षण व्यवस्थेतुन बाजूला करायचे या अनुषंगाने मोठे षडयंत्र राबविले जात असल्याचे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले.
सुयेकचे अध्यक्ष डॉ. राहूल शं. म्होपरे म्हणाले की, प्राचार्य आनंद मेणसे सरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची शिदोरी आपणास दिली आहे. त्यासाठी त्यांनी विमानाचे उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. ते म्हणाले की विमानाला धावपट्टीवरून हवेत उड्डाण घेण्यासाठी धावपट्टीवर चाकांच्या साह्याने वेग घ्यावा लागतो. किमान वेग प्राप्त झाल्यावरच विमान आकाशात उड्डाण घेते, आकाशात उड्डाण घेतल्यानंतर ज्या चाकांच्या सहाय्याने विमानाने वेग घेतलेला असतो ती चाके विमान स्वतःच्या पोटात घेते आणि पुढील प्रवासाला निघून जाते. अगदी तशाच प्रकारे माडखोलकर कॉलेजचे हे सर्व विद्यार्थी आणि ऐकणारे श्रोते ही सुद्धा वेगवेगळी विमानेच आहेत, भावी आयुष्यात समाजाच्या धावपट्टीवर जीवनाचे उड्डाण घेताना प्राचार्य मेणसे सरांनी सांगितलेला राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा विचारांची ही चाके आपल्या पोटात घेतील आणि आयुष्याचे उड्डाण चांगल्या प्रकारे यशस्वी रित्या पूर्ण करतील याचा आत्मविश्वास वाटतो. राजर्षी शाहूंनी केलेले शैक्षणिक आणि आरोग्य विषयक कार्य ही एक प्रकारची मानवी भांडवल गुंतवणूकच होती. आज मानवी भांडवल गुंतवणुकीची संकल्पना जगभर मान्य झालेली आहे. जी राजर्षिनी १२५ वर्षे अगोदर कोल्हापूर संस्थानात प्रत्यक्षात यशस्वीरीत्या राबवून एकप्रकारे संपूर्ण जगालाच दिशा दिली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले, ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणे अत्यंत गरजेचे आहे तरच सुजाण नागरिक तयार होतील.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. अरुण जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. ए. डी. कांबळे व डॉ.एन.एस.मासाळ यांनी केले. आभार डॉ. एस. जी. गोरड यांनी मांडले.
विशेष उपस्थिती मध्ये चंदगड पोलीस स्टेशनचे ए पीआय श्री भोळे, सुएकचे कार्याध्यक्ष प्रा.एम जी पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अरुण जाधव, कार्यकारणी सदस्य डॉ. सी.आर.जाधव, डॉ.भारत सोलापूर असे विविध मान्यवर, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा