Breaking

गुरुवार, १९ मे, २०२२

*महात्मा गांधीजींची हत्या विषारी प्रवृत्तीने केली ; देशाला तारण्यासाठी गांधी विचारांची आवश्यकता : गांधीजींचे पणतू मा.तुषार गांधी यांचे प्रतिपादन*


गांधीजींचे पणतू मा.तुषार गांधी मार्गदर्शन करताना

*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये 'आजादी का अमृत महोत्सव' याअंतर्गत राज्यशास्त्र विभाग व IQAC चे वतीने 'आजच्या परिस्थितीत महात्मा गांधी विचारांची आवश्यकता' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलं होतं.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते मा.तुषार गांधी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील व प्र.प्राचार्य प्रा.डॉ.सौ.मनिषा काळे उपस्थित होत्या.

     सुरुवातीस मा. तुषार गांधी हस्ते रोपटयास जलार्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.डॉ. महावीर अक्कोळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविकात ते म्हणाले, आजच्या बेधुंद व अवैचारिक परिस्थितीत सुरु असलेल्या परिस्थितीला ताळ्यावर आणण्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचारांची आवश्यकता असून यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू असल्याचे ते म्हणाले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम समन्वयक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के.डी.खळदकर यांनी केला.

   आजच्या परिस्थितीत महात्मा गांधी विचारांची आवश्यकता ह्या विषयावर भाष्य करताना मा. तुषार गांधी म्हणाले की, महात्मा गांधीजीचे विचार सर्वांना अपेक्षित आहेत मात्र कृतीरुपी गांधी नको आहेत.विषारी विचार व कृती यामुळे म. गांधीजींच्या विचारांची हत्या राजरोसपणे चालू आहे.आजच्या परिस्थितीत देशात अराजकता माजली असून याला आपण सर्व कारणीभूत आहोत. चुकीचे विचार व अयोग्य आचरणाने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांना मूठमाती देण्याचा प्रयत्न होत आहे. एका बाजूला आजादी का अमृतमहोत्सव साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला या ७५ वर्षात विषारी विचार व  प्रवृत्तीने हा देश नाशविला जात आहे.

       मा.तुषार गांधी पुढे म्हणाले की, देशासमोर  बेरोजगारी  महागाईचा भस्मासुर बोकाळत असताना दुसऱ्या बाजूला हा प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकीय घटकाकडून जाणीपूर्वक धर्मा - धर्मामध्ये,जाती - जाती मध्ये भेद निर्माण करून समाजमन कलुसित केले जात आहे.एकसंघ समाज्या ऐवजी दुभंगलेले समाज निर्माण करत आहेत.मात्र गांधीजींना विविधतेतून  एकसंघ समाज निर्माण व्हावा ही अपेक्षा होती .मात्र आज राज्यकर्ते ,धर्मगुरू यांच्याकडून मंदिर - मशिद,चर्च या मध्ये समाज विभागण्याचे  भोंग्यवरील नमाज विरुध्द हनुमान चालीसा    अशा अनावश्यक वाद निर्माण केला जात आहे.समाजातील बहुसंख्यांक समुहांकडून  दलीत,अल्पसंख्यांक समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. गोरक्षकंकडून मॉब लिंचींग माध्यमातून हत्या होत आहेत.धर्मांधता, उच्चनीचता व  प्रादेशिक वाद यामध्ये जनतेला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र  बेरोजगारी ,महागाई यासारख्या मुख्य प्रश्नावर  राज्यकर्ते चर्चा करायला तयार नाहीत.त्याचबरोबर  आज बालकापासून वृद्धापर्यंत प्रत्येक घटक मोबाईलच्या अधीन गेला आहे. जनता मूळ प्रश्न व विषयापासून दूर जाऊन तिची विकासापेक्षा विध्वंस व अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याबाबतची खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोना महामारीच्या काळात असमर्थ शासनामुळे प्रचंड अटीतटीचे प्रश्न निर्माण झाले होते. 

   मात्र पुन्हा या देशात गांधी विचारांची आवश्यकता आहे यासाठी सत्य, अहिंसा,प्रेम  ,परधर्मसहिष्णुता व परिस्थितीनुरूप बदल करून पुन्हा नव्याने देशाला संजीवनी देण्याची आवश्यकता असल्याबाबतचे ते पोटतिडकीने बोलले.

      सदरच्या कार्यक्रमात  गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव द्वारे आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत  यशस्वी झालेले प्रा.डॉ.आर. एस.ढब्बे व यशस्वी विद्यार्थी  व श्री. बाहुबली भनाजे  यांचा सत्कार मा.तुषार गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बाहुबली भनाजे यांनी गांधीजीच्या जीवन पटावर आधारित  दुर्मिळ चित्रांचे  प्रदर्शन भरविले होते. याबद्दल तुषार गांधी यांनी श्री.भनाजे व कॉलेजने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्याचबरोबर कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीबाबत कौतुक केले.

        संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले, खरंच आजच्या  परिस्थितीत गांधी विचारांनीच माणुसकीचे दर्शन होऊ शकते आणि खऱ्या अर्थाने मानवता हाच खरा धर्म असून सर्वांनी तो आचरणात आणला पाहिजे.

       या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.डॉ. बाळासाहेब सरगर यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. सौ. सुनंदा शेळके यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन जयसिंगपूर कॉलेज व राज्यशास्त्र विभागाने केले.

       या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, शिरोळ तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक व गांधीवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी,सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक संजीव मगदूम व संजय चावरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा