![]() |
ठरावाची प्रत प्रदान करताना धरणगुत्तीच्या सरपंच विजया कांबळे ,ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी सोबत मा.शेखर पाटील |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
धरणगुत्ती : 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या उक्तीप्रमाणे कृतीची जोड देणारी धरणगुत्ती ही ग्रामपंचायत शिरोळ तालुक्यातील एक अग्रगण्य व नावाजलेली ग्रामपंचायत आहे. शासनाच्या प्रत्येक आदेशाचं शतप्रतिशत अंमलबजावणी करून शासनाचे किंबहूना लोकांचे हित जोपासण्याचा काम या धरणगुत्ती ग्रामपंचायतीने आजतागायत केलेला आहे.
![]() |
ठरावाची प्रत |
भारतीय संविधानाला अनुसरून पुरोगामी विचाराला बळ देणारी व शासनाच्या आदेशाचे पालन करून या ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या सन्मानासाठी ठराव केला आहे. तसेच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. समितीच्या माध्यमातून लोक प्रबोधन करून ही प्रथा बंद करण्याचे आवाहन करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेईल, असे प्रतिपादन माजी सरपंच, दत्त कारखान्याचे कार्यशील संचालक शेखर पाटील यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील हेरवाडने विधवा कुप्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर गणेश वाडीबरोबर धरणगुत्ती ग्रामपंचायतीने ही ९ मे रोजी विधवा प्रथा बंदचा ठराव केला होता. ठरावाच्या इतिवृत्ताच्या सर्व बाबी पूर्ण करून मंगळवारी त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.
धरणगुती येथे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठरावाची प्रत सरपंचाकडे सुपूर्द करताना ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केबळे यांनी ठरावाचे वाचन केले.
शेखर पाटील म्हणाले, १९९५ पासून ग्रामपंचायतीत जो ठराव होईल त्याची अंमलबजावणी धरणगुती ग्रामपंचायती कडून केली जाते. नेहमीच गावाच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितार्थ दृष्टीकोन ठेवला आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीत केलेल्या ठरावानंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाते. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या कारभाराला नेहमीच पाठबळ दिले आहे. विधवा प्रथा बंदीचा ठराव केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रबोधनातून प्रयत्न केले जातील. गावातील विधवा महिलांच्या सन्मानार्थ होणारा ठराव प्रयत्न सर्वांच्या हितार्थ आहे त्यामुळे सर्वांनी या रचनात्मक कामासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
याप्रसंगी सरपंच विजया कांबळे, उपसरपंच जीवनसिंग रजपूत, काकासो पाटील, सदस्य, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा