Breaking

शनिवार, ९ जुलै, २०२२

तीर्थ विठ्ठल - शेर विठ्ठल

 

श्री हरि विठ्ठल


सुप्रसिद्ध गझलकार  मा.प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८ ५०८ ३० २९०)


नमस्कार ,आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... या निमित्ताने गेल्या सदतीस वर्षाच्या गझल लेखन प्रवासातील अनेक शेरांपैकी साठपेक्षा अधिक शेर...तीर्थ विठ्ठल - शेर विठ्ठल


जरी माणसे चालली पंढरीला

विठू माणसांच्याच वारीत आहे..

-------------

वारा पेक्षा वारीने समतेचा जागर होतो

मी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत होतो..

---------------

गझल म्हणजे चारधामी तीर्थक्षेत्रे

अन तिच्या वारीतला मी शब्दयात्री..

----------------

वीट ती मिळेल काय विठ्ठला उभारण्यास ?

बघ अधांतरी समाज राहिला युगेयूगेच....

-------------------

सर्व पापांना धुतांना बोललेली चंद्रभागा

मिळविण्याला मोक्ष येथे 'माणसांशी नीट वागा..'..


विठ्ठलाला कर्मकांडे मान्य ही नव्हतीच केंव्हा

भावभक्तीनेच त्याच्या अंतरी सर्वास जागा..

-------------

पुरे पुष्पकाची अनाहूत चर्चा

अभंगात त्याच्या बघावा तुकोबा..


सुरू पोपटांची भजन - किर्तनेही

तुकोबा कडोनी शिकावा तुकोबा..

---------------------------

तो संतांचा संस्कार कुठे ?

हा श्रद्धेचा व्यापार कुठे ?...


निरुपणाची लाख बिदागी

ज्ञानोबाला घरदार कुठे ?.....

-----------------------------

होऊ सारे विवेकवादी

कारण विठ्ठल मानववादी..


मोक्ष कल्पना गुंडाळावी

कारण विठ्ठल जीवनवादी..


गरिबांचा तो विचार करतो

कारण विठ्ठल समाजवादी..

---------  -----

संतांवर बोलत बोलत तो संतच समजत आहे

ते अमृत अनुभव आता नागोबा सांगत आहे..


विठ्ठलही विटला आहे या इथल्या भोंदुगिरीला

या आसारामी मठास तो सुरुंग लावत आहे...

--------–-------------------

जळी, स्थळी अन काष्ठी वसतो

निसर्गामध्ये विठ्ठल रमतो..


पंढरपूर हा त्याचा  पत्ता

पण ,भक्तांच्या हृदयी असतो..

----------------------

ऊब गझलेत जाणवते तरी

ओवी - अभंग पांघरून बघू...

-------------- --

सुखाच्या कीर्तनाला

झडोनी द्वेष यावे....

----–--------

आरतीस गर्दी मोठी रोज भाविकांची

देवळात दिसला नाही विठू राहताना...

---------------

लेकरांच्यात हा भेद का ?

भक्त देवांवरी कोपला...

---–--------

नाही शिवारात पाणीच विठोबा

वारीतले पाय भेंडाळले आज...

----------–----

इमारती सुन्यासुन्या

विठू दिसे विटेवरी..

----------------

चरचराच्या साठी लिहून गेला ओव्या

सखा खरा विश्वाचा पसायदानी ज्ञाना...

-----------------

प्रेमरसाळी अभंग म्हणतो हे गझलेला

तुझ्या एकदा मुशायऱ्याला यावे म्हणतो...

---------- -  -----

अजान वृक्षाखाली ज्ञाना हेच म्हणाला

पानोपानी गझल दिसावी नवीन वर्षी..


अभंग,ओवी, दोहा गवळण ,श्लोक म्हणाले

आपण सुद्धा गझल लिहावी नवीन वर्षी....

-----------------

त्यांच्या खऱ्या जगण्यामध्ये संतत्व शोधाया नको

ज्ञानाविना,तुकयाविना ज्यांची सुरू पारायणे...

----------------

युगेयुगे हा उभाच विठ्ठल

निवांत होते मठात सारे...

-------------

असते शपथ ज्ञात ही पायरीला

नाहीच शिखरास गाठावयाचे...

------------   -----

जागर केला ज्ञानोबाने

शेर लिहावे संत तुक्याने...

-----–------–

मी चारधाम यात्रा केली कधीच नाही

माणूस शोधतांना सरला प्रवास माझा..

------------

मी आज ज्ञानराया तुझियाच प्रेरणेने

ह्या पालखीत गझला घालून नेत आहे..

------–--------

माणूस वेगळा हा या प्रार्थनेत आहे

कोठे असेल पूजा,कोठे नमाज आहे..

---------------

एवढेच पुण्यकर्म लागलो करावयास

माणसास माणसात आणतोय आजकाल...

---------------

सांगतो ज्ञानराया ही कहाणी युगांची

स्वागताला युगांच्या थांबले शब्द माझे..

---------------

जिथे गीत माझे असे गाडलेले

तिथे बांधली मी स्वतःची समाधी...

---------- -- --

ठेवती गीतेवरी या हात सारे

पण खऱ्याने बोलण्याचा प्रश्न आहे..

--------------

अद्वैत भावनेला सांगून संत गेले

श्वासात आज माझ्या तू एकरूप व्हावे..

------------- 

सूर तेथे बासरीचे ऐकतो मी

कृष्ण जेथे सोडतो रानात गाई..


धर्म येथे स्थापला मी माणसांचा

दूर गेले, सर्व माझे जातभाई...

-------------------

नाही तुक्या तुझीही गाथा तरुन गेली

गेली बुडून पाने, आल्या तरुन अफवा..

------––---

माणसांची खरी जात आहे कुठे ?

धर्म जाती मुळे विखरती माणसे..


दोष देऊ नये माणसांना उगा

शेवटी देह हा उचलती माणसे..

-------––--

येऊ कसा विठू मी गर्दीत दर्शनाला ?

नावे तुझ्या दलाली दिसतेच नेहमीची..

----------------

रोजचा व्यापार माझा हा तुक्याच्या सारखा

कोहळा देऊन हाती राहिलेला आवळा...

--–------------

भक्तांची हळहळ झाली तोतया निघाल्यानंतर

पण,प्रसाद सांगत होता मी अंध पुजारी नाही..

-----------------

विठ्याची वैरणीसाठी असे शेती

कुठे पण दूध त्याच्या लेकरा आहे ?

-------

तो पावत होता नवसाला

जो हाल स्वतः सोसत आहे..

---- ---

भट्टीत भाजलेली रखमा मला म्हणाली

माझा विठू बिचारा आहे इथे विटेवर..

------------

वाट तशी ही किचकट आहे

आयुष्याची फरफट आहे..


वाट चालूनी पाय म्हणाले

प्रवास पुढचा धुरकट आहे...

----- ---

जाहलो गझलचाच भक्त मी

वाटतो प्रसाद हा घरोघरी..

--- --- 

तुला ही प्रार्थना माझी

फुलू दे वेदना माझी..


गझलने मांडली आहे

विठुची कल्पना माझी..

-----------

मानवतेला उरात ठेवा

संत वेगळा असतच नाही...

-----------

थोडा प्रकाश पसरो अंधारल्या ठिकाणी

कामात येत राहो माझे लिखाण -वाणी..


मूर्तीस दान त्याने सोने - हिरे दिलेले

थाळीत फेकतो तो कुच्छित होत नाणी...

-----------------

हृदये जोडत प्रेम घराशी होऊ शकते

माझे घरही मदिना - काशी होऊ शकते..


जमिनीवरती पडता पडता थेंब म्हणाला

माझी मैत्री पुन्हा नभाशी होऊ शकते...

------------------

सर्वस्वाचे दान द्यायचे 

म्हणून जातो गाणी वाटत..


तुझ्या कृपेची पोच पावती

जीर्ण न होते..नाही फाटत...

--------------

मी प्रसादाची भुकेली

प्रार्थना हे बोललेली..


भंगलेली भिंत माझी

या विटेने जोडलेली..

---------

भक्ता तुझे जिणेही केले महाग यांनी

भरते न पोट केंव्हा ठेऊन अंधभक्ती..


सत्तेस कैक साधू- योगी हपापलेले

कपड्यांशिवाय त्यांची दिसते कुठे विरक्ती ?....

---------------------

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा