![]() |
प्रा. डॉ. एम.एस. देशमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख यांची निवड घोषित करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.डी.टी. शिर्के यांच्या हस्ते डॉ. देशमुख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी गेल्या आठवड्यात मुलाखती घेण्यात आल्या होत्या.आज त्यांची निवड घोषित करण्यात येऊन नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ.पी. एस पाटील यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील, डॉ. पी.डी. राऊत, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, संगणक विभागाचे प्रभारी संचालक अभिजीत रेडेकर, सहाय्यक कुलसचिव सुनीता यादव आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख हे अत्यंत शांत, संयमी व अर्थशास्त्रातील गाढे अभ्यासक म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. उद्दिष्टनिहाय व नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची हातोटी आहे. अर्थशास्त्र विषयातील अभ्यासू संशोधक व अध्यापनाची कुशलता प्राप्त असणारे प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ.महादेव देशमुख हे सामाजिक चळवळ व बांधिलकीच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. संशोधनात्मक कार्याचा आवाका मोठा असून कृतिशील कामाला प्राधान्य देणारे आहेत. यासाठी त्यांचे सहकारी प्राध्यापक यांच्या समवेत राज्य सरकारला संशोधनात्मक व प्रयोगशील प्रस्ताव पाठवले आहेत.डॉ. देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक सुश्रुत बहुआयामी व्यक्तिमत्त्व होय.कामाला प्राधान्य देणे अर्थात अध्ययन-अध्यापन व संशोधन कार्याला प्राधान्य देत असल्याने ते सहाजिकच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक आहे. शिवाजी विद्यापीठाला NAAC कडून प्राप्त झालेले A+ मानांकन संपादन करण्या मध्ये त्यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे.
मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्त करण्यात आलेले डॉ. महादेव श्रीरंग देशमुख अर्थात सुपरिचित असणारे डॉ.एम.एस. देशमुख हे सध्या विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक तसेच इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस कक्षाचे प्रभारी संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळासह अधिसभेवर देखील त्यांनी कार्य केले आहे. विद्यापीठाच्या तसेच शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून त्यांचे ५३ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. २१ पुस्तकांचे ते लेखक आहेत. गेली २५ वर्षे ते अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या हाताखाली सहा संशोधकांनी पीएच.डी. तर एकाने एम.फील.ची पदवी संपादन केली आहे. पाच संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. सुमारे ८६ लाख रुपयांच्या कन्सल्टन्सी प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे. दोन आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांच्या संपादक मंडळावर ते सदस्य आहेत. शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचा (सूयेकचा) मानाचा डॉ. धनंजयराव गाडगीळ पुरस्कार, नवी दिल्ली येथील शैक्षणिक संघटनेकडून राधाकृष्ण सुवर्णपदक पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना डॉ. महादेव देशमुख म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र शाखेचा अधिष्ठाता म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सन्माननिय कुलगुरू प्रो.डॉ. डी.टी.शिर्के व प्रशासनाचे आभारी आहे.मानव्यशास्त्र विद्याशाखेची गुणवत्तेत वाढ करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन प्रकर्षाने प्रयत्न केला जाईल.
अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. देशमुख यांची मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व घटकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष करून शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रो. डॉ. सौ.व्ही.पी.कट्टी, प्रो.डॉ.पी.एस.कांबळे, प्रो.डॉ. ज्ञानदेव तळूले, प्रो. डॉ.एस.टी.कोंबडे, प्रा.एस.पी.पंचगल्ले तसेच शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्याकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. त्यांच्या या निवडीने एका अभ्यासू ,गुणवत्तापूर्ण संशोधक व कार्यशील प्राध्यापकाच्या कामगिरीचा सन्मान असल्याबाबतचे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा