![]() |
मार्गदर्शन करताना ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.वसंतराव जुगळे,प्रा. डॉ. जे.एफ.पाटील व प्राचार्य प्रा. डॉ. मोहन राजमाने |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कराड : शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर, (सुयेक ) यांच्या वतीने चालू वर्षांमध्ये विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेतील सहावे पुष्प आज शनिवार दि. २७ ऑगस्ट, २०२२ रोजी रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड येथील डॉ.एन.डी.पाटील सभागृहामध्ये अर्थशास्त्र विभाग, एस.जी.एम. कॉलेज, कराड व सुयेक यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थतज्ञ प्रा.डॉ वसंतराव जुगळे यांच्या मार्फत गुंफण्यात आले. डॉ. जुगळे यांनी उपस्थितांना "अर्थशास्त्रीय सिद्धांतातील आधुनिक प्रवाह" या विषयावर मार्गदर्शन केले. सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजचे माननीय प्राचार्य प्रा.डॉ.मोहन राजमाने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थितीमध्ये सुयेकचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.राहुल शं. म्होपरे, कार्याध्यक्ष प्रा.एम. जी. पाटील, कार्यवाह,/ खजिनदार प्रा.डॉ.संजय धोंडे, सुयेकचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष ख्यातनाम अर्थतज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्राचार्या प्रा.डॉ. सौ.योजना जुगळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. रमजान मुजावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विषयाच्या अभ्यास मंडळाचे चेअरमन तसेच कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.अण्णा काका पाटील यांनी केले. एस. जी. एम. कॉलेज मार्फत सूयेकचे विद्यमान अध्यक्ष डॉ. राहुल शं. म्होपरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्रा. डॉ.वसंतराव जुगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानामध्ये त्यांनी, "अर्थशास्त्रीय सिद्धांतांचा उगम हा ॲस्ट्रो फिजिक्स द्वारे कसा होत गेला. सुरुवातीला निसर्गवादी विचार कसे आकाराला आले व त्याद्वारे पुरवठा प्रधान व नंतर मागणी प्रधान व्यवस्था कशी आकाराला येत गेली , त्यातून संपत्तीची निर्मिती, वस्तूच्या मूल्याच्या निश्चितीचा प्रश्न याकडे अर्थशास्त्र कसे वळत गेले पुढे त्यातूनच आधुनिक व नव उदारमतवादी विचार कसे प्रगल्भ होत गेले. याचे सविस्तर विश्लेषण केले. अर्थशास्त्र हे सुरुवातीला 'दुर्मिळता व अनंत गरजा' यांचा मेळ घालण्यात गुंतलेले होते, नंतर मात्र त्याने विभाजनाचा प्रश्न,दारिद्र्य निर्मूलनाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न व नंतर समाजाच्या शाश्वत कल्याणचा प्रश्न याकडे विकसन होत होत कशी प्रगती केली याचे विवेचन त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये केले. त्यातून आधुनिक, नव आधुनिक व नवीन आधुनिक अशा स्तरांवर अर्थशास्त्राची सैद्धांतिक मांडणी कशी होत गेली व त्यामधील केन्सियन, मालथुसियन विचारांपासून अर्थशास्त्रीय विचार उत्क्रांत कसे होत होत ते अमर्त्य सेन यांनी मांडलेला सार्वजनिक निवडीचा प्रश्न व दुष्काळ व दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या सुचविलेल्या प्रभावी योजना व रिचर्ड थ्यालर यांची नझ थियरी यांच्यापर्यंतचे सिद्धांतिक विश्लेषण कसे विकसित झाले. याचे सुबोध विवेचन केले.
प्रमुख उपस्थित प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्राचार्या डॉ.सौ. योजना जुगळे यांनी देखील मनोगते व्यक्त केली. शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर सुयेकचे विद्यमान अध्यक्ष डॉ. राहुल शं. म्होपरे यांनीही सुयेकची या सर्व व्याख्यानमालांच्या आयोजनामागील भूमिका व सुयेक मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम यांची उपस्थितांना माहिती देवून सुयेकच्या व्यासपीठावरील आजचे व्याख्यान म्हणजे एक सुवर्णक्षण असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाची सांगता सुयेकचे कार्यवाहक/ खजिनदार प्रा. डॉ. संजय धोंडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व सद्गुरु गाडगे महाराज, कॉलेज, कराड. मधील बी. ए., बी. कॉम., बी. बी.ए., बी.सी. ए. अशा विविध विद्याशाखांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुयेकने सुरू केलेल्याया व्याख्यानमाला उपक्रमाचे व कराडच्या SGM कॉलेजने आयोजित केलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाचे विद्यार्थी, पालक व सर्व वर्गाकडून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा