![]() |
मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.किशोर सुतार सोबत प्रा.डॉ. शिवाजी भोसले व प्रा.डॉ.प्रकाश टोणे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सातारा : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताहानिमित्त सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा अर्थशास्त्र विभागातर्फे "डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आर्थिक विचार" या विषयावर प्रा.डॉ. किशोर सुतार अर्थशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य.डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे होते.
सुरुवातीस अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.एस. एम. भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमा योजनेचा उदात्त हेतू स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा.डॉ.किशोर सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आर्थिक विचार" विशद करताना अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्रज्ञ लिप्से यांचे अर्थशास्त्रीय मूलभूत सहा प्रश्न, नैसर्गिक व मानवी संसाधन साधने याविषयी स्पष्टीकरण दिले.हार्वे लिबिस्टिन, प्रा.नर्क्स, अमर्त्यसेन यांच्या आर्थिक विचारांशी कर्मवीर अण्णांचे कार्य साम्य दर्शवणारे होते असे सांगितले.मानवी संसाधनांचा योग्य वापर शिक्षणाद्वारे, समाजकार्याद्वारे करण्याचे खरे श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील यांना जाते असे त्यांनी नमूद केले. कमवा आणि शिका या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचे धडे व सहकारातील कर्मवीरांचे कृतीतून धडे उदाहरणाद्वारे सांगितले.वसतीगृहातील मुलांच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आण्णांनी एक मुठ पीठ प्रत्येकांच्या घरातून गोळा करण्याची कल्पना हे सहकाराचेच एक जिवंत उदाहरण आहे असे त्यांनी नमूद केले. कर्मवीर अण्णांचे जीवन कार्य,कृती व त्यांचे आर्थिक विचार आपल्या मार्गदर्शनातून सरांनी व्यक्त केले. प्रा.डॉ.सुतार यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून कर्मवीर अण्णांचे एक अनोख्या व वास्तववादी अर्थशास्त्रीय व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविले.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर प्रा.डॉ.प्रकाश टोणे यांनी कर्मवीर आण्णांच्या कार्याला उजाळा देऊन आण्णांच्या आर्थिक कार्यावर लेखन करण्याचा मनोदय व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उत्तम व नेटकेपणाने सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन खामकर यांनी केले.या कार्यक्रमाचे आभार प्रा.ए. एस. जगताप यांनी मानले.
या कार्यक्रमास प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाबाबत विद्यार्थी घटकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा