![]() |
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ.प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ.दीपक देशपांडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एस.विनोदकर आणि प्रा. आर.एच.भंडारे |
*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
भिलवडी : येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय , भिलवडी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस अत्यंत प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. या दिनाचे प्रमुख पाहुणे जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. प्रभाकर माने व अध्यक्षस्थानी कॉलेजचे कार्यशील प्राचार्य प्रा.डॉ.दिपक देशपांडे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. व्ही.एस. विनोदकर यांनी केले. सदर प्रसंगी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिवस आयोजनाचा उदात्त हेतू स्पष्ट केल. प्रमुख पाहुयांचा परिचय प्रा.आर. एच.भंडारे यांनी करून दिला.यावेळी प्रा.डॉ.एस.डी.कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा.डॉ.प्रभाकर माने मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करणे हा औपचारिकतेचा भाग बनत चालला आहे. या दिवसाचे औचित्य साधून काही रचनात्मक उपक्रम राबवून देश विकासाला बळ देण्याचं काम करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नैतिक राष्ट्रीय चारित्र्य,वास्तव राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवा व देशातील प्रत्येक घटकाविषयी असणारी संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे.ज्या देशाचा शिक्षण व्यवस्था व युवक कमकुवत असतो तो देश रसातळास जातो. सबल ध्येय, उत्साह आणि जोश मनात असेल तरच देशाचा विकास होत असतो. म्हणून तरुणांनी या योजनेत सहभागी होऊन देश बलवान केला पाहिजे.जागतिक क्रमवारीत भारत हा १२८ क्रमांकावर असून जगातील लहान देश भारताच्या पुढे आहेत कारण त्यांचे राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न,स्त्री पुरुष प्रमाण व आयुष्यमान याबाबतीत हे देश जागतिक क्रमवारीत भारतापुढे आहे.रोजगार निर्मिती, उत्तम शिक्षण, निरोगी आरोग्य व युवकांना सुरक्षितता प्रदान करणारी व तरुणांना सक्षम बनवणारी कोणतीही गोष्ट जबाबदारीने पूर्ण केली जात नाही. या देशात ३५ टक्के तरुणाई असून हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असल्याने देश सक्षम करण्यासाठी युवकांचे योगदान महत्वाचे आहे.ज्या समाजाला आपण काम करतो त्या समाजाला समजून घेणे , स्वतःला पात्र बनविणे. समाजाच्या गरजांची माहिती करून घेणे ,त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करणे हे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची नितांत आवश्यकता आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संवेदनशील व संस्कारक्षम पिढीद्वारे महासत्तेचे स्वप्न साकारता येणार आहे.यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांनी निस्वार्थी भावनेने, सामाजिक बांधिलकी जपत आणि भारतीय संविधानाला स्मरून देशासाठी पर्यायाने समाजासाठी मनापासून योगदान दिले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना श्रमाला प्रतिष्ठा देते आणि महात्मा गांधींचा विचार प्रत्यक्षात कृतीत आणते.
यावेळी या कार्यकमाचे अध्यक्ष व कार्यशील प्राचार्य प्रा.डॉ. दीपक देशपांडे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वंयसेवक हा सेवाभावी वृत्तीने राबतो. समाजाची सेवा मनोभावे करीत असतो.भिलवडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये एन एस एस स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गावातील गाळ स्वच्छ करणे, इतर घटकांकडून लोकांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देणे, आपत्ती व्यवस्थापन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करणासाठी अहोरात्र कष्ट घेतले. कोरोना काळात केलेली उत्तम कामगिरी, पल्स पोलीओ , व्यसनमुक्ती अभियान , मतदान जनजागृती अभियान , स्वच्छ भारत अभियान,बेटी वाचवा अभियान व साक्षरता अभियान अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देवून काम केले आहे. यापुढेही असंच राष्ट्रीय कार्य ती पुढे करत राहतील.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दि. २४ / ९ / २०२२ रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. सौ . एन.एस.गायकवाड यांनी मानले.या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी,प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
या कार्यक्रमाच्या आयोजना बाबत विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
अभिनंदन सर
उत्तर द्याहटवा