![]() |
प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा.डॉ. नितीश सावंत हे उपस्थित होते.
सुरुवातीस प्रा.डॉ.तुषार घाटगे यांनी उपस्थित पाहुणे व मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले, मूल्य शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्यासाठी आणि महान व्यक्तींनी केलेल्या कामाची ओळख व्हावी हा उदात्त हेतू आहे. यावेळी तनुजा ठोंबरे १२ वी आर्टस् च्या विद्यार्थिनीने कर्मवीरांच्या संदर्भातील भित्तीपत्रक तयार केल्याबद्दल डॉ.महावीर अक्कोळे यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आले.
डॉ.महावीर अक्कोळे मार्गदर्शन करताना म्हणाले, महाराष्ट्रातील शैक्षणिक पाया व विकासाचा दीपस्तंभ म्हणून कर्मवीर अण्णांच्या कडे पाहावे लागेल. कर्मवीर अण्णांचा शैक्षणिक व सामाजिक जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला. यासाठी अण्णांच्या विषयी माहित नसलेल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. अण्णा म्हणजे बहुजन समाजासाठी शैक्षणिक कवाडे उघडणारे शिक्षण महर्षी होय. शिक्षणाची शहरी भागातील मक्तेदारी मोडून काढीत शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्या व दुर्गम भागातील घरापर्यंत पोहोचवणारे अवलिया म्हणून त्यांनी प्रतिमा तयार केली. मान अपमान याच्या पलीकडे जाऊन निस्वार्थी भावनेने काम करीत घरोघरी ज्ञानदीप लावण्याचे काम त्यांनी केले. बॅरिस्टर पी.जी.पाटील या सुप्रसिद्ध व्यक्तीच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून तसेच अत्यंत गरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचं काम त्यांनी अहोरात्र केले. वेळेप्रसंगी शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी घरातील सोनं गहाण ठेवले.
ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटवून लोकांच्या मनात स्वाभिमान रुजविणारा, देव दगडात नसतो माणसात असतो हे हेरून इथल्या माणसांमध्ये माणुसकी पेरणारा "लोकमहर्षी", "शिक्षणमहर्षी" म्हणजेच अर्थात "कर्मवीर भाऊराव पाटील”होय.
कर्मवीरांच्या विषयी बोलताना ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजाच्यावर अटळ विश्वास व श्रद्धा होती. कर्मवीर म्हणाले होते की,एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलीन पण वसतीगृहाला दिलेलं “शिवाजी महाराजांचं " नाव नाही बदलणार अस छातीठोक पणे सांगितले. यातून महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी असलेली अतूट श्रद्धा दिसून येते.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थानावर बोलताना प्र.प्राचार्य प्रा.डॉ.सावंत म्हणाले, बहुजन प्रतिपालक व शैक्षणिक विकासाचा महामेरू अर्थात कर्मवीर अण्णा होय. समाजभान व संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीसमोर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येक घटकांना आपलं कार्य नि:स्वार्थी भावनेने करावे.
या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.डॉ.सुनील बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्तम व नियोजनबद्ध सूत्रसंचालन प्रा. बडबडे व प्रा.सौ.अंजना चौगुले-चावरे यांनी केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. सौ.मनिषा काळे, महाविद्यालयातील सिनिअर व ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक - कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा