![]() |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
नागठाणे : आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे या महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग व शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुएकच्या विशेष व्याख्यानमालेतील *नवव्या व्याख्यानाचे* आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.राजाराम कांबळे यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ.आर.ए. वाईंगडे (देवचंद कॉलेज,अर्जुननगर ) यांनी दारिद्र्य मापनातील बहुआयामी दृष्टिकोन या विषयावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
डॉ. वाईंगडे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये दारिद्र्याची संकल्पना स्पष्ट करून दारिद्र्य निर्मूलनासाठी दारिद्र्याचे योग्य आणि अचूक मापन आवश्यक असल्याचे मत मांडले. त्यांच्या मते दारिद्र्य मापणाचा परंपरागत दृष्टीकोन हा संकुचित मानला जाऊन त्याऐवजी जागतिक पातळीवर तसेच भारतामध्ये दारिद्र्य मापणाचा नवीन दृष्टिकोन मांडण्यात आलेला आहे ज्यामध्ये दारिद्र्याचे बहुआयामी स्वरूप विचारात घेऊन दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक विकसित करण्यात आलेला आहे. जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमामार्फत सन 2010 पासून जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक प्रकाशित केला जातो आहे तर भारतामध्ये नीती आयोगामार्फत अलीकडेच नोव्हेंबर 2021 राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक विकसित करण्यात आलेला आहे. डॉ वाईंगडे यांनी आपल्या व्याख्यानातून या दोन्ही निर्देशकांच्या आधारे दारिद्र्य मापणाची प्रक्रिया स्पष्ट करून त्याआधारे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण हे 25 % असल्याचे मत मांडले. या कार्यक्रमांतर्गत शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर व महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग यांच्यात सामंजस्य करार( MoU) करण्यात आला.
यावेळी सुयेकचे अध्यक्ष डॉ.राहुल शं. म्होपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सुएकची विशेष व्याख्यानमाला सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच कृतिरुपी कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या प्रत्येक महाविद्यालयात तसेच अर्थशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुएक कार्यकारिणी मार्फत केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा उहापोह केला. जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ.पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन महाविद्यालयाचे व अर्थशास्त्र विभागाचे तसेच सुएक कार्यकारिणीचे चांगल्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले.
प्र.प्राचार्य डॉ.अजितकुमार जाधव आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले ,भारत हा खेड्यांचा देश आहे त्यामुळे अनेकांना दारिद्र्याचे चटके बसलेले आहेत . आजही बहुतांश लोकसंख्या दारिद्रयात जीवन जगत आहे . दारिद्र्याचे मापन करताना शिक्षण, आरोग्य , वीज व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या मूलभूत सोयींचाही विचार होणे आवश्यक आहे . आर्थिक समृद्धी साधण्यासाठी अर्थशास्त्रीय बदलांचा अभ्यास करून दारिद्र्य , बेरोजगारी यासारख्या समस्यांचं उच्चाटन होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुएक कार्यकारणी सदस्य डॉ.रमजान मुजावर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुएक उपाध्यक्षा (सातारा जिल्हा) प्रा.श्रीमती जयमाला उथळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्राध्यापक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. सदर कार्यक्रमाचे औचित्त साधून शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर व महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग यांच्यात सामंजस्य करार( MoU) देखील करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा