Breaking

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

कोल्हापूर - लोहपुरुष स्पर्धेत प्राध्यापक डॉ.नवनाथ इंदलकर यांनी मिळवले घवघवीत यश 🏊‍♀🏃🏻🚴🏽

 

प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर 

सांगली : २ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित लोहपुरुष - कोल्हापूर  (Olympic Distance Triathlon) या  स्पर्धेत सांगली येथील श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेजचे प्राध्यापक डॉ.नवनाथ इंदलकर यांनी ३१ ते ४५ या वयोगटात आठवा तर एकूण स्पर्धकांमध्ये १२वा क्रमांक पटकावला.

      या लोहपुरुष स्पर्धेचे स्वरूप १५०० मीटर पोहणे,  ४० किलो मीटर सायकलिंग आणि १० किलो मीटर धावणे असे होते. हे सर्व टप्पे ६ तासात पूर्ण करणे अनिवार्य होते. डॉ. नवनाथ इंदलकर यांनी हे सर्व टप्पे एकूण ३ तास, १० मिनिटे व १७ सेकंदात पूर्ण करून हे यश मिळवले. त्यांच्या या यशामागे मार्गदर्शक किरण साहू यांचा मोलाचा वाटा आहे.

सायकलिंग पूर्ण झाल्यानंतरचा एक क्षण


     पेशाने शिक्षक असणाऱ्या डॉ.नवनाथ इंदलकर यांना या खेळाची प्रचंड आवड आहे.  याआधीही त्यांनी सायकलिंग तसेच धावणे ( marathon) स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश मिळवले आहे. ज्यामधे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय सैन्य दलाकडून आयोजित २०० किलो मीटर सायकलिंग स्पर्धेत डॉ.इंदलकर यांनी महाराष्ट्रातून प्रथम तर पूर्ण देशभरातून चौथा क्रमांक पटकावला होता. सांगली ते गोवा १८० किलो मीटर, रोटरी क्लब इचलकरंजी द्वारा आयोजित १०० किलो मीटर, कराड स्पोर्ट्स क्लब आयोजित ५० किलो मीटर सायकलिंग स्पर्धा, तसेच २१ किलो मीटर धावणे ( marathon)  अशा विविध स्पर्धेत डॉ. नवनाथ इंदलकर यांनी उत्तुंग असे यश मिळवले आहे.

     डॉ.इंदलकर यांचे मूळ गाव सूर्याची वाडी, ता. खटाव, जिल्हा सातारा हे आहे. सध्या ते सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे असोसिएट प्रोफेसर आहेत. आपल्या शिक्षकी पेशासोबत या खेळाच्या आवडीमध्ये तसेच यशामागे त्यांचे मार्गदर्शक किरण साहू, कुटुंबीय, शिक्षक सहकारी व मित्रांचा मोलाचा वाटा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा