![]() |
कर्मवीर भाऊराव पाटील समुह विद्यापीठ साताराच्या प्रभारी कुलसचिव पदी डॉ. विजय कुंभार यांची निवड |
प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ.विजय कुंभार यांची कर्मवीर भाऊराव पाटील समुह विद्यापीठ,साताराच्या प्रथम कुलसचिव पदी नियक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत सदर नियुक्ती करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रा. डॉ. डी टी शिर्के यांनी या विद्यापीठाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा अधिसूचना २०२१ नुसार या विद्यापीठाचे प्रथम कुलसचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी डॉ. कुंभार यांचेवर सोपवलेली आहे.डॉ.कुंभार हे रयत शिक्षण संस्थेत सन २००५ पासून अर्थशास्त्र व बँकिंग विषयाचे अधिव्याख्याता व सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य केलेले असून सन २०१३ पासून ते बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यानी सन २०११ मध्ये ख्यातनाम अर्थतज्ञ प्रा. डॉ. वसंतराव जुगळे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक बँकिंग व कस्टमर्स सॅटिस्फॅक्शन या विषयातून पीएच.डी. ही पदवी संपादित केलेली आहे, ते एक उत्तम संशोधक व लेखक असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संशोधन विषयक जर्नल्स मधून ६८ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. डॉ कुंभार हे १२ क्रमिक पुस्तके व ३ संदर्भ ग्रंथ आणि ५० पेक्षा अधिक स्वयंअध्ययन पुस्तिकेचे लेखक असून त्यांचा उत्कृष्ट संशोधक म्हणून अनेक वेळा गुणगौरव झालेला आहे.
डॉ. कुंभार यांचे मल्टी बँक डेबिट कार्ड हे पेटंट पब्लिश झालेले असून लवकरच त्यास भारत सरकारच्या पेटंट ऑफिस कडून मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे.सन २०१५ ते २०२२ या कालावधीत दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा या पगारदार नोकरांच्या सहकारी बँकेचे २ वर्षे चेअरमन आणि ५ वर्षे संचालक म्हणून देखील त्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. या बँकेचे संगणकीकरण व ग्राहक सेवा सुधारणांमध्ये डॉ. कुंभार यांचे योगदान आहे. डॉ कुंभार हे रयत शिक्षण संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट विभागाचे सहाय्यक समन्वयक, सेंट्रल प्लेसमेंट ऑफिसर म्हणून देखील कार्यरत आहेत. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उभारणीमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून ग्रामीण भागातील युवक युवतींना बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील रोजगार विषयक संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून या केंद्रातील अनेक विद्यार्थी देशातील विविध बँका व वित्तीय संस्थांमध्ये व्यवस्थापक, प्रोबेशनरी ऑफिसर्स, स्पेशालिस्ट ऑफिसर्स, असिस्टंट इत्यादी पदावर कार्यरत आहेत. डॉ. कुंभार यांनी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयास स्वायत्तता मिळवून देण्यासाठी देखील विशेष योगदान दिलेले असून रयत शिक्षण संस्थेतील पहिल्या स्वायत्त महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून सन २०१६ पासून काम पाहित आहेत. या महाविद्यालयातील बीकॉम बँक मॅनेजमेंट आणि एम कॉम बँक मॅनेजमेंट हे पदवी व पदवी तर कोर्सेस सुरू करण्यामध्ये व ते नावारूपास आणण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच ते कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विविध स्वायत्त महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर आणि अकॅडमी कौन्सिलवर ते सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत. सन २०१८ते २०२२ या कालावधीत त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठातील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग विषयाच्या अभ्यास मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे तसेच या विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केलेले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाच्या प्रथम कुलसचिव पदी नियुक्ती होणे ही महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या महान कार्यात विद्यापीठाचा सेवक म्हणून सहभागी होण्याची संधी हे परमभाग्य असून असून या नव्याने सुरू होणाऱ्या विद्यापीठाची पायाभरणी करण्यासाठी मिळालेली ही संधी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची संधी असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट स्वरूपाच्या उच्च शिक्षण विषयक व संशोधन विषयक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. कुंभार यांनी आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी पलुस येथील औद्योगिक वसाहतीमधील कामधेनू इंजिनिअरींग मध्ये लेथ मशीन ऑपरेटर, वेल्डर तसेच फोटो प्रिंटिंग लॅब मध्ये प्रिंटर म्हणूनही काम करून स्वतःचे शिक्षण पुर्ण केले. तळसंगी ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथील एका सर्वसामान्य अशिक्षित शेतमजूराच्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. विजय कुंभार यांनी आई-वडीलांच्या प्रेरणेतून जिद्दीने पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून देण्याचे अनेक प्रसंग उद्भवले असताना देखील अशा प्रसंगावर मात करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.
त्यांच्या या कर्तृत्वाचा आणि योगदानाचा विचार करून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, विद्यापीठाच्या लीड कॉलेजचे प्राचार्य डॉ. भारत जाधव आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी त्यांची निवड केली. या सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी विशेष योगदान देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. विजय कुंभार यांच्या संशोधनास ए.डी. सायंटिफिक इंडेक्स या मिशिगन युनिव्हर्सिटी मधील संशोधक प्राध्यापकांनी तयार केलेल्या जागतिक निर्देशांकात अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग या विषयात संशोधन करणाऱ्या जगभरातील सर्व संशोधकांचे शोध निबंध व त्यास प्राप्त झालेले सायटेशन एच इंडेक्स व आय-टेन इंडेक्सच्या आधारे हा जागतिक निर्देशांक तयार केला जातो. या निर्देशांकात डॉ. विजय कुंभार यांना सन २०२० मध्येही मानांकन प्राप्त झाले होते तसेच सन २०२१ व २०२२ मध्ये देखील त्यांच्या संशोधनास या इंडेक्स मध्ये अव्वल स्थान प्राप्त झालेले आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सामाजिक शास्त्रे तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांमध्ये डॉ. कुंभार यांच्या संशोधनास जागतिक पातळीवर मानांकन प्राप्त झाले असून या 'व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग' विषयातील जगभरातील संशोधकांमध्ये त्यांचा भारतात ११ वा तर आशिया खंडात ३६ वा आणि जागतिक पातळीवर १२७ व्या स्थानी आहेत.
डॉ. विजय कुंभार यांचा विद्यार्थीदशेपासून ते आजपर्यंतचा प्रवास हा संशोधनात्मक राहिला आहे. अत्यंत तरुण व कार्यशील प्राध्यापक, उत्तम वक्तृत्व, खूप नम्र, संयमी,अभ्यासू, संशोधनात्मक जिज्ञासा व विद्यार्थीप्रिय अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दिसून येतात.
आज तागायत एकूण २ मायनर व १ मेजर प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. डॉ.विजय कुंभार यांची संशोधनात्मक पकड मजबूत असल्यामुळे ते विविध संस्थांमध्ये संशोधन समितीवर कार्यरत असुन ते 'रयत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट' (RIRD) संस्थेच्या संशोधन सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत, डॉ. कुंभार हे 'दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बॅंक लि.सातारा' या २२०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बँकेचे चेअरमन होते व सध्या या बॅंकेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा या बँकेच्या प्रगतीसाठी ही होत असून शिवाजी विद्यापीठाच्या व्यवसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मार्गदर्शक म्हणून त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यांचं हे कार्य पाहता विविध स्वायत्त संस्थेच्या अभ्यास मंडळावर त्यांची निवड झाली आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी सलग तिसऱ्यांदा जागतिक स्तरावरील अत्यंत नावाजलेल्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये स्थान मिळणे हे शिवाजी विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था व अर्थशास्त्राच्या संशोधनात्मक गुणवत्तेच्या दृष्टीने अत्यंत कौतुकस्पद व अभिमानास्पद आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ साताऱ्याच्या प्रथम प्रभारी कुलसचिवपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. विजय कुंभार यांचे 'जय हिंद न्यूज नेटवर्क' परिवाराच्या वतीने अभिनंदन व पुढील प्रशासकीय व शैक्षणिक कार्यास शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा