Breaking

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

*देशाचा सर्वकष आर्थिक विकास हा शेती क्षेत्रावर अवलंबून : डॉ.एम.एन.शिंदे यांचे प्रतिपादन*


सुयेक व्याख्यानमालेत पुष्पगुंफताना प्रा. डॉ. एम.एन.शिंदे व अन्य मान्यवर 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा : सातारा येथील लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स ,सातारा याठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर (सुयेक) आणि लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानमालेतील १६ वे पुष्प मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त डॉ.एम.एन.शिंदे यांनी गुंफले.  

   कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलाने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.रमजान मुजावर यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकतेतून शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनची भूमिका सांगून भारतीय शेतीची सद्यस्थिती आणि शेती क्षेत्रासमोरील आव्हाने विशद केली.अर्थशास्त्र विभागातील प्रा.रमेश मदने यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुयेकचे अध्यक्ष डॉ.राहुल म्होपरे यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनमध्ये घेण्यात येत असलेल्या व्याख्यानाचा उद्देश आपल्या मनोगतातून स्पष्ट करून सुयेकच्या वाटचालीची माहिती विद्यार्थ्यांना दिली.या व्याख्यानमालेतून अर्थशास्त्र व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान प्राप्त होत असते असे त्यांनी सांगितले.

सुयेकचे अध्यक्ष डॉ.राहुल म्होपरे विशेष मार्गदर्शन करताना

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त डॉ.एम.एन.शिंदे यांनी “भारतीय शेतीची दशा आणि दिशा” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापारामध्ये पहिल्या १० देशामध्ये भारताचा क्रमांक लागतो. रशिया-युक्रेन ही दोन्ही राष्ट्रे बहुउत्पादक असून या राष्ट्रांच्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गहू व तांदळाची कमतरता निर्माण झाल्याने भारताने १४० कोटी जनतेची अन्नाची गरज भागवून जगातील सर्व देशांना भारताने सर्व देशांना अन्नधान्याचा पुरवठा केला. जगाच्या एकूण निर्यातीमध्ये भारतीय शेतीचा वाटा  १४.३०% आहे. शेतीची प्रगती होत गेली कारण संकरीत बियाणे, रासायनिक खते वापरली उत्पादनात वाढ झाली परंतु त्याप्रमाणात उत्पादनात वाढ झाली नाही. डॉ.स्वामिनाथन यांच्या मते, आजची आर्थिक वाढ मोठ्या लोकसंख्येला बाजूला ठेवणारी, आनंददायी नसणारी, दीर्घकाळात शाश्वत नसणारी आहे. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान आहे मग या शेतीची अवस्था अशी का झाली? आज भारताने गांधीयन मॉडेल स्वीकारले असते तर ग्रामीण विकास, शेतीचा विकास , शेतमजुरांचा विकास यावरती म.गांधीजींचा भर होता.हे मॉडेल स्वीकारले नसल्याने आज भारतीय शेतीची ही अवस्था झाली. आज शेती व्यवसायात अनेक धोके आहेत उदा.अतिपाऊस पडतो परिणामी पिकांचे नुकसान खूप होते. प्रा.हॉले यांच्या अनिच्छीततेच्या सिद्धांतामध्ये उत्पादनात किंवा व्यवसायात उत्पादक जास्त धोके पत्करतो त्यामुळे त्याला नफा मिळतो मग शेतीमध्ये देखील जास्त धोके असतात पण होलेचा सिद्धांत शेती क्षेत्राला का लागू केला जात नाही. सरकारने शेती धोरणात बदल करून शेती क्षेत्राकडे लक्ष दिले पाहिजे. रेल्वे क्षेत्रापेक्षा शेती क्षेत्र मोठे आहे मग रेल्वेसाठी अंदाजपत्रक आहे तर शेतीसाठी वेगळे अंदाजपत्रक नाही.    

    कार्यक्रमाचे अध्यक्ष एल.बी.एस.कॉलेज सातारा येथील माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.एन.व्ही.शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शेतमालाला योग्य भाव दिला जावा तरच शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होईल असे सांगितले.ब-याच वेळा शेतमाल विकला गेला नाही तर टाकून दिला जातो किंवा त्या शेतमालाची नासाडी होते परंतु हे नुकसान मोठे शेतकरी सोसू शकतील लहान शेतक-यानी काय करायाचे या संदर्भात आपले मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालायाचे उपप्राचार्य डॉ.अशोक तवर, छत्रपती शिवाजी कॉलेज साताराचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.अनिल वावरे, सुयेकचे माजी अध्यक्ष डॉ.एस.एम.भोसले उपस्थित होते तसेच शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर नुकतीच सदस्यपदी निवड झालेले डॉ.अनिल सत्रे यांचा देखील याठिकाणी विशेष सत्कार घेण्यात आला. याचबरोबर या कार्यक्रमात शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर (सुयेक) आणि लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागातील प्रा.प्रियांका पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुयेकचे कार्यकारणी सदस्य आणि एल.बी.एस.कॉलेज सातारा येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.रमजान मुजावर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा