Breaking

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

*सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान सुवर्ण अक्षरी आहे : प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन*


मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विचारवंत मा.प्रसाद माधव कुलकर्णी व प्राचार्य प्रा. डॉ. उल्हास माळकर व प्रा. सुजाता आवटी 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


मिरज : भारतीय स्वातंत्र्यलढा हा जगातील एक अत्यंत प्रदीर्घकाळचा, मोठ्या लोकसहभागाचा लढा आहे. या लढ्यात सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचेही योगदान अतिशय मोठे आहे.सांगली जिल्ह्यातील एकोणीस हुतात्मे आणि सोळाशेहून अधिक स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या मागे असलेले लाखो लोकांचे बळ हा स्वातंत्र्य आंदोलनातील सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा प्रेरणादायी इतिहास आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते कन्या महाविद्यालय, मिरज येथे न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे कन्या महाविद्यालय आणि यशवंत शिक्षण संस्थेचे मिरज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सामाजिक शास्त्रे मंडळ यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात "सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान "या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उल्हास माळकर होते. 

     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ. माधुरी देशमुख यांनी करून दिला.

        मा.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनातून, सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्याच्या चळवळीचे स्वरूप, मिठाच्या सत्याग्रहातील सांगलीचा सहभाग, बिळाशीचा जंगल सत्याग्रह ,कायदेभंगाची चळवळ, तासगाव पलिकेवरील  तिरंगा झेंडा, वैयक्तिक सत्याग्रह ,कायदेभंग चळवळ,  टिळक, गांधीजी व नेहरू यांच्या सांगली भेटी, आचार्य शंकरराव जावडेकर यांचे योगदान, खादी प्रसार व प्रचार, रेल्वे स्टेशने जाळणे, पाटीलकीचे राजीनामे,सशस्त्र लढा,सांगली तुरुंग फोडणे, प्रतिसरकारचे काम,महिलांचे योगदान, शब्दशः प्राणाची बाजी लावून लढणे आदि अनेक मुद्दे मांडत सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा धगधगत्या जाज्वलतेचा इतिहास उभा केला. अण्णासाहेब पत्रावळे, किसन अहिर, नानक सिंग ,चांद साहेब पटवेगार,उमाशंकर पंड्या,सुलोचना जोशी आदी अनेक हुतात्म्यांसह पुंडलिक कातगडे ,क्रांतीसिंह नाना पाटील, पद्मभूषण वसंतदादा पाटील ,क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी.बापू लाड ,डॉ.कुर्तकोटी,  वा.बी.शीखरे, माधव कुलकर्णी,वी.स. पागे,बंकटलाल सारडा,काकासाहेब खाडिलकर,बेर्डे गुरुजी,नामदेवराव कराडकर,आत्माराम शांताराम बापू गरुड, राजमतीताई पाटील,लीलाताई पाटील आदी अनेकांच्या योगदानाचा परिचय करून दिला. स्वातंत्र्य कशासाठी आणि कोणासाठी याबाबतची स्पष्ट भूमिका घेऊन लढलेले स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्योत्तर काळातही समाज बांधणीच्या कामात वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे योगदान देताना दिसतात. त्यांचे योगदान ,त्याग, धाडस यांचा अंगीकार करण्याची आज गरज आहे असे स्पष्ट करून प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या  भाषणात आपल्या ओघवत्या शैलीत सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अनेक उदाहरणांनी उलगडून दाखवले.

    अध्यक्ष स्थानावरून बोलताना कार्यशील प्राचार्य प्रा.डॉ. उल्हास माळकर म्हणाले, स्वातंत्र्य आंदोलनातील लढ्याचे ऐतिहासिक केंद्र म्हणून सांगली जिल्ह्याकडे पहावे लागते .सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी हिरीरीने व धाडसाने या आंदोलनात सहभाग घेतला. देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. हा जाज्वल्य इतिहास आपण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

    या कार्यक्रमाचे आभार प्रा.सौ.सुजाता आवटी यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. विनायक वनमोरे यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ.गंगाधर चव्हाण, प्रा.रमेश कट्टीमनी, प्रा.बाबासाहेब सरगर , डॉ.शबाना हळंगळी, डॉ. विनायक पवार, प्रा. अभिनव औरादकर ,प्रा. संतोष शेळके यांनी केले. 

      या व्याख्यानास दोन्हीही महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा