![]() |
शोकसभेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के,प्र-कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ.विद्या कट्टी |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना घडवणारे, सातत्याने मार्गदर्शन करणारे आणि संशोधक विद्यार्थ्याना पुढे नेणारे जेष्ठ अर्थतज्ञ आणि अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांची उणीव विद्यापीठात कायम राहणार आहे, असे मत कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी अर्थशास्त्र विभागात आयोजित करण्यात आलेल्या डॉ. जे. एफ. पाटील यांच्या शोकसभेच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले,आदरयुक्त व्यक्तिमत्त्व आणि शिस्तीचे डॉ. जे. एफ. पाटील यांनी शेवटपर्यत शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले. निवृत्तीनंतरही बावीस वर्षे त्यांनी विविध क्षेत्रात आपले योगदान दिले. चांगला शिक्षक हा कधीही निवृत्त होत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. जे. एफ. पाटील अशी भावना डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली. महावीर अध्यासनाच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान असून, याबाबत त्यांनी प्रशासनाकडे सातत्यान पाठपुरावा केला असेही वेळी कुलगुरू म्हणाले. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी डॉ. जे. एफ. पाटील यांचे समाजातील भरीव योगदान न विसरण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी डॉ. जे. एफ. पाटील यांच्या कार्याची माहिती दिली व आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. निशा पवार, डॉ. विजय ककडे, डॉ. भारती पाटील, डॉ.पी.एस. कांबळे, डॉ. तळुले, डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. राहुल म्होपरे, डॉ. मारुलकर आणि विठ्ठल तब्बे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शोकसभेचा प्रस्ताव अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. विद्या कट्टी यांनी मांडला. त्यांनी यावेळी डॉ. जे. एफ. पाटील यांचे अर्थशास्त्र विभागातील अध्यापन आणि संशोधनाच्या योगदानाची माहिती दिली या शोकसभेला प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या शोकसभेत भावनिकतेचा बांध फुटून उपस्थितांचे डोळे पाण्याने डबडबले होते. काहीनी आपले अनुभव व विचार शब्दातून व्यक्त न करता ओल्या चिंब डोळ्यातून व्यक्त केले. सर्वांचे गुरुवर्य डॉ.जे.एफ.पाटील यांची उणीव व जाणीव सातत्याने भासणार आहे हे मात्र सत्य आहे. शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाचा एक वैचारिक व संशोधनात्मक दबदबा निर्माण करणारा सूर्य प्रचंड अनुभव,विकासात्मक व रचनात्मक कार्य सोडून कायमस्वरूपी अस्तास गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा